छत्तीसगडमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी येथे भाजपा आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. असे असतानाच येथे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. येथे माजी विरोधी पक्षनेते नंदकुमार साई यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माझ्यावर पक्षात अन्याय झाला, अशा भावना त्यांनी या वेळी व्यक्त केल्या.
माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले, प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न- नंदकुमार साई
नंदकुमार साई हे छत्तीसगडमधील वरिष्ठ नेते आहेत. भाजपामध्ये असताना त्यांना मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हटले जायचे. मात्र भाजपाने त्यांच्याऐवजी रमणसिंह यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून निवड केली. दरम्यान, त्यांनी आता भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनामापत्रात त्यांनी माझ्यावर अन्याय झाला, असे म्हटले आहे. “माझ्या राजकीय प्रवासात भाजपाने माझ्यावर अनेकदा महत्त्वाची जबाबदारी सोपवली. या संपूर्ण जबाबदाऱ्या मी वेळोवेळी समर्थपणे सांभाळण्याचा प्रयत्न केला. याबद्दल मी पक्षाचे आभार व्यक्त करतो. मात्र मागील काही वर्षांपासून पक्षातील काही लोकांकडून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. तसेच माझ्याविरोधात वेगवेगळे कट रचून माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच कारणामुळे मी दुखावलो आहे. शेवटी खूप विचार करून मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी पक्षाच्या सदस्यत्वाचा तसेच पक्षांतर्गत देण्यात आलेल्या सर्व पदांचा राजीनामा देत आहे,” असे नंदकुमार साई राजीनामा देताना म्हणाले आहेत.
हेही वाचा >> Karnataka Election : कर्नाटकातील अर्ध्याहून अधिक जागांवर महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षाही जास्त!
आम्ही त्यांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू- भाजपा
नंदकुमार साई यांनी राजीनामा दिला असला तरी आम्ही त्यांना पक्षात परत आणण्याचा प्रयत्न करू. त्यांच्याशी आम्ही चर्चा करू, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. “नंदकुमार साई हे खूप वरिष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. त्यांचे काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करू,” असे भाजपाचे नेते तथा खासदार अरुण साव म्हणाले. भाजपाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्याकडे नंदकुमार साई यांचे राजीनामापत्र नुकतेच आले आहे. आम्ही त्यांना पक्षात परत आणण्यासाठी प्रयत्न करू,” असे रमणसिंह म्हणाले.
…तरीदेखील त्यांना भाजपामध्ये अपमानास्पद वागणूक- काँग्रेस
नंदकुमार साई यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने भाजपावर सडकून टीका केली आहे. भाजपामध्ये आदिवासी समाजाच्या नेत्यांवर नेहमीच अन्याय केला जातो, असा आरोप काँग्रेसने केला आहे. “मागील अनेक वर्षांपासून भाजपाकडून आदिवासी समाजाच्या नेत्यांवर अन्याय केला जात आहे. नंदकुमार साई यांनी भाजपासाठी खूप काही केले. मात्र तरीदेखील त्यांना भाजपामध्ये अपमानास्पद वागणूक मिळाली,” असे काँग्रेसचे समाजमाध्यम विभागप्रमुख सुशीलकुमार शुक्ला म्हणाले.
हेही वाचा >> “पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांसमोर रडतात,” प्रियंका गांधींच्या आरोपानंतर काँग्रेसकडून CryPMPayCM मोहीम सुरू
नंदकुमार साई यांची राजकीय कारकीर्द
दरम्यान, नंदकुमार साई हे छत्तीसगडमधील मोठे राजकारणी असून त्यांची अनेक महत्त्वाच्या समित्यांवर नियुक्ती करण्यात आलेली आहे. छत्तीसगड राज्याची निर्मिती होण्याआधी १९७७, १९८५, १९९८ या साली ते मध्य प्रदेशच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले होते. छत्तीसगड राज्याची स्थापना झाल्यानंतर २००० साली ते विरोधी पक्षनेते होते. १९८९, १९९६ आणि २००४ साली त्यांनी लोकसभा निवडणूक लढवीत विजय प्राप्त केला होता. २००९ आणि २०१० साली ते राज्यसभेवर खासदार होते. या कार्यकाळात त्यांची अनेक महत्त्वाच्या समित्यांवर नियुक्ती करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीचे गणित बदलणार का?
साई यांनी आदिवासी समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तसेच आदिवासी समाजाचे शोषण, अत्याचार रोखण्यासाठी वेगवेगळ्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. असे असताना नंदकुमार यांच्या रूपात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. याच कारणामुळे भाजपासाठी आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित बदलणार का? असे विचारले जात आहे.