Chhattisgarh Elections Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवल्यानंतर भाजपानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आपल्या विजयाची घोडदौड कायम ठेवली. गुजरातमध्ये निवडणूक न लढविताच भाजपानं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील तब्बल २१५ जागा बिनविरोध जिंकल्या. त्यानंतर छत्तीसगडमध्येही पक्षानं महापौरपदाच्या सर्वच १० जागांवर दणदणीत विजय मिळवला. इतकंच नाही, तर राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींमध्येही भाजपाचाच दरारा पाहायला मिळाला. छत्तीगडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल शनिवारी जाहीर झाले.

भाजपाचे छत्तीसगडमध्ये निर्विवाद वर्चस्व

२०२३ च्या विधानसभा निवडणुकीपासून भाजपाचे छत्तीसगडमध्ये निर्विवाद वर्चस्व आहे. लोकसभा निवडणुकीतही पक्षानं राज्यात चांगली कामगिरी करत सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. आता शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकून भाजपानं राज्यातून काँग्रेसला जवळपास हद्दपारच केलं आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षानं आपल्या अनेक जुन्या जागा गमावल्या असल्या तरी पक्षाला आनंदाची एक बातमी मिळाली. मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या कुंकुरी येथील नगर पंचायत अध्यक्षपदाची जागा काँग्रेसनं जिंकली.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसची कामगिरी निराशाजनक

भाजपानं एकूणच महापालिका निवडणुकांत महापौरपदाच्या सर्वच्या सर्व १० जागा जिंकल्या. त्याचबरोबर नगरपालिकांची ४९ पैकी ३५ अध्यक्षपदं आणि नगरपंचायतींची ११४ पैकी ८१ अध्यक्षपदं भाजपानं जिंकली. विशेष बाब म्हणजे छत्तीसगडमधील २०१९ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपाला महापौरपदाच्या एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी निराशाजनक ठरली. पक्षाला नगरपालिकांमध्ये आठ अध्यक्षपदं आणि नगर पंचायतींमध्ये २२ अध्यक्षपदं जिंकता आली.

आणखी वाचा : Indian immigrants : अमेरिकेनं बाहेर काढलेल्या भारतीयांवरून पंजाबमध्ये वाद; मायदेशी परतल्यावर काय होणार?

२०१९ मध्ये काँग्रेसला मिळाला होता विजय

छत्तीसगडमधील २०१९ च्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसनं १० पैकी नऊ महापौरपदांवर दणदणीत विजय मिळवला होता. त्याचप्रमाणे २०१९ मध्ये काँग्रेसनं नगरपंचायत अध्यक्षपदाच्या तब्बल ४८ जागा जिंकल्या होत्या; तर भाजपला केवळ ३८ जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. काँग्रेसनं २१ नगरपालिकांमध्ये यश मिळवलं होतं; तर भाजपानं १६ जागा जिंकल्या होत्या.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विजयानंतर काय म्हणाले?

दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी भाजपाच्या या विजयाला ऐतिहासिक म्हटलं आहे. माध्यमांबरोबर संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळेच पक्षाला एवढा प्रचंड विजय मिळाला आहे. मोदींची हमी, आमच्या सरकारनं १३ महिन्यांत केलेली विकासकामं आणि भारतीय जनता पार्टीची वचनबद्धत्ता यामुळेच जनतेनं आमच्यावर अढळ विश्वास टाकला आहे.” भाजपाच्या वतीनं महापौरपदाची निवडणूक जिंकणाऱ्यांमध्ये रायगडचे चहाविक्रेते जीवधरन चौहान यांचाही समावेश आहे.

चहाविक्रेता झाला छत्तीसगडचा महापौर

चौहान यांच्या विजयाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री साय म्हणाले, “रायगडमध्ये एका कष्टाळू चहाविक्रेत्याला महापौरपदाचा उमेदवार ठरवून भाजपंने हे सिद्ध केलं आहे की, पक्षात कार्यकर्त्यांच्या निष्ठा व समर्पणाचा आदर केला जातो.” रायपूर येथील महापौरपदाची जागा जिंकल्यानं भाजपाला बळकटी मिळाली आहे. या जागेवर तब्बल १५ वर्षांनंतर पक्षानं विजय मिळवला आहे. भाजपाच्या उमेदवार मीनल चौबे यांना महापौरपदाच्या निवडणुकीत तीन लाख १५ हजारांचं मताधिक्य मिळालं; तर काँग्रेसच्या दीप्ती दुबे यांना १.६२ लाख मतं मिळाली.

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा पराभव

भाजपानं महापालिका निवडणुकीत महापौरपदाच्या सर्व १० जागा जिंकल्या असल्या तरी कुंकुरीमध्ये पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ही नगर परिषद मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात येते. दरम्यान, भाजपा उमेदवाराच्या पराभवाबद्दल विचारलं असता, मुख्यमंत्री म्हणाले, “आम्ही जनादेशाचा आदर करतो. मी खात्री देतो की, या प्रदेशात विकासकामं थांबणार नाहीत.” आम आदमी पार्टीनंही छत्तीगडमध्ये विजयाचं खातं उघडलं आहे. पक्षानं बिलासपूर जिल्ह्यातील बोदरी येथील नगरपालिकेच्या अध्यक्षपदावर विजय मिळवला आहे.

हेही वाचा : Mohan Bhagwat: विधानसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधीच मोहन भागवत यांचा पश्चिम बंगाल दौरा, १० दिवसांच्या दौऱ्याला इतके महत्त्व का?

भूपेश बघेल यांच्या बालेकिल्ल्यातही कमळ फुललं

छत्तीसगडमध्ये भाजपाच्या लाटेत काँग्रेसचे अनेक बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले. माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या पाटण मतदारसंघातही भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला. पाटण नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे योगेश निक्की भाले यांनी ६०० हून अधिक मतांनी विजय मिळवला. काँग्रेसनं पाटण नगरपंचायत अध्यक्षपदासाठी लक्ष्मी नारायण पटेल यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विजयासाठी माजी मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रचारही केला होता. मात्र, १५ प्रभागांपैकी भाजपानं आठ जागांवर विजय मिळवला; तर काँग्रेसला केवळ सातच जागांवर समाधान मानावं लागलं.

गुजरातमध्ये भाजपा न लढताही विजयी

गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन हजार १७८ जागांसाठी रविवारी (१६ फेब्रुवारी) मतदान होणार आहे. त्याआधी काँग्रेसच्या तब्बल २१५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत, ज्यामुळे निवडणुकीतील स्पर्धा कमी झाली. या सर्व जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. २०२७ मध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. दरम्यान, भाजपा नेत्यांचं दबावतंत्र आणि धमक्या यांमुळे आमच्या उमेदवारांनी घाबरून माघार घेतली, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. निवडणुकीतून माघार घेतलेल्या सर्व उमेदवारांची काँग्रेसकडून हकालपट्टी करण्यात येणार आहे.

Story img Loader