पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे शुक्रवारी एका जाहीर सभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसचा पंजा राज्याच्या विकासाच्या आड येत आहे. छत्तीसगडच्या विकासामध्ये काँग्रेसचा पंजा मोठ्या भिंतीप्रमाणे आडवा आला. या पंजाने राज्याच्या जनतेचे हक्क हिसकावून घेतले. या पंजानेच राज्याची लूट करून लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. त्यांच्यासाठी छत्तीसगड हे केवळ एटीएम मशीनसारखे असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. रायपूर येथे विजय संकल्प महारॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या माध्यमातून एक प्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने मोदी यांनी काँग्रेसवर अनेक आरोप केले. ते म्हणाले, “मागच्या निवडणुकीत काँग्रेसने राज्यातील जनतेला ३६ आश्वासने दिली होती. दारूबंदी करणे हे त्यापैकी एक आश्वासन होते. पाच वर्षे निघून गेले; पण दारूबंदी काही झाली नाही. उलट काँग्रेसने दारूच्या घोटाळ्यातून हजारो कोटींची कमाई केली आहे, याबद्दलचा सर्व तपशील वर्तमानपत्रांत छापून आलेला आहे.” छत्तीसगडच्या स्थापनेत भाजपाचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. राज्यातील जनतेच्या गरजा काय आहेत? हे भाजपाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. आज आम्ही सात हजार कोटींहून अधिक किमतीच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन या ठिकाणी करत आहोत, असेही ते पुढे म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “आता काँग्रेसचे लोक माझ्यावर हल्ला करतील. माझी कबर खोदण्याची धमकी देऊन, माझ्याविरोधात कटकारस्थान रचतील. पण, त्यांना माहीत नाही की, जो घाबरतो तो मोदी असू शकत नाही. काँग्रेस आता खोटी आश्वासने देऊन मागच्या पाच वर्षांतला भ्रष्टाचार आणि गैरकारभार लपवू पाहत आहे. तुम्हाला या खोट्या आश्वासनांपासून सावध राहण्याची आणि काळजी करण्याची आवश्यकता आहे. भाजपा हा एकमेव असा पक्ष आहे की, जो खरी आश्वासने देऊन ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो.”

आपल्या नऊ वर्षांच्या पंतप्रधानपदाचा कार्यकाळ सांगत असताना मोदी म्हणाले, “मागच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात केंद्रातील भाजपा सरकारने छत्तीसगडमधील धान उत्पादकांना एक लाख कोटीहून अधिक रक्कम दिली आहे. या वर्षीही २२ कोटींहून अधिकची रक्कम धान उत्पादकांना मिळणार आहे. फक्त भाजपाच असा पक्ष आहे की , जो शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत जाणून त्यांच्यासाठी काम करीत आहे. काँग्रेस पक्षाने मात्र नेहमीच शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रायपूर, छत्तीसगड येथे सात हजार कोटींच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन केले. मोदी यांनी अंतागड (कांकेर जिल्हा) ते रायपूरदरम्यान धावणाऱ्या नव्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. तसेच विविध चार पदरी राष्ट्रीय महामार्गांचेही उदघाटन केले. आयुष्मान भारत या योजनेंतर्गत ७५ लाख लाभार्थींना कार्डवाटप करण्याची सुरुवात मोदी यांच्या हस्ते आजपासून करण्यात आली. दरम्यान, आज सकाळी छत्तीसगडमधील बिलासपूर येथील महामार्गावर एका बस अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे लोक पंतप्रधान मोदींच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी अंबिकापूर येथून रायपूरला येत होते. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

छत्तीसगडमधील कार्यक्रम आटोपल्यानंतर पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे गीता प्रेस प्रकाशन संस्थेच्या शताब्दी सोहळ्याचा समारोप करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या समारोप सोहळ्यासोबतच ते उत्तर प्रदेशमधील विविध प्रकल्पांचे उदघाटन आज करणार आहेत. गीता प्रेस प्रकाशन संस्थेला नुकताच ‘गांधी शांतता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आज मोदी यांच्या हस्ते गीता प्रेसतर्फे ‘शिव पुराण’च्या विशेष आवृत्तीचे प्रकाशन केले जाणार आहे. या ग्रंथामध्ये १८ प्रमुख पुराणांचा समावेश असणार आहे. यासोबतच गोरखपूर रेल्वेस्थानकावरून ‘वंदे भारत’ रेल्वेलाही पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखविणार आहेत. त्यानंतर वाराणसी येथे विविध प्रकल्पांचे उदघाटन करण्याचा कार्यक्रम नियोजित केलेला आहे.

१९२३ साली गोरखपूर येथे गीता प्रेसची स्थापना झाली होती. या प्रकाशन संस्थेला शतकपूर्तीनिमित्त केंद्र सरकारतर्फे नुकताच मानाचा असा ‘गांधी शांतता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावरून देशभरात अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. पुरस्कार देण्यासाठी जी परीक्षक समिती आहे, त्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. या पुरस्कारांतर्गत एक कोटीची रक्कम बक्षीस म्हणून मिळते. ‘गीता प्रेस’ने हा पुरस्कार स्वीकारला असला तरी ही रक्कम न स्वीकारता, ती पंतप्रधान निधीला देण्याचा निर्णय घेतला. मागच्या वर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेली देणगीची रक्कमही स्वीकारण्यास ‘गीता प्रेस’ने विरोध केला होता.