नोव्हेंबर महिन्यात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपापली रणनीती ठरवत उमेदवार उभे करत आहे. छत्तीसगडमध्ये आज (२५ ऑक्टोबर) भाजपाने आपली ४ मतदारसंघांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. विद्यमान आमदारांना डावलून ४ नवीन उमेदवार भाजपाने उभे केले आहेत. या भाजपाने विद्यमान आमदारांना तिकीट का दिले नाही, भाजपाची रणनीती काय आणि नवीन कोणते आमदार उभे राहणार हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
भाजपाने पुढील महिन्यात होणाऱ्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२५ ऑक्टोबर) अंतिम चार उमेदवारांची नावे जाहीर केली. या चार मतदारसंघांमध्ये अंबिकापूर आहे. इथे लखनपूर नगर पंचायतीचे भाजपाचे माजी अध्यक्ष राजेश अग्रवाल हे उपमुख्यमंत्री टी. एस. सिंग देव यांच्या विरोधात उभे आहेत.
हेही वाचा : सरसंघचालकांच्या भाषणात वोकवादाचा उल्लेख, काय आहे या संकल्पनेचा इतिहास
”अग्रवाल हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, लखनपूर हा त्यांचा आणि काँग्रेसलाचाही बालेकिल्ला आहे. अग्रवाल हे एक प्रबळ दावेदार आहे,” असे अग्रवाल यांच्या समर्थकांपैकी एक म्हणाला.बिलासपूर जिल्ह्यातील बेलतारा येथील विद्यमान आमदार रजनीश सिंह यांना तिकीट नाकारून सुशांत शुक्ला यांना उमेदवार म्हणून निवडण्यात आले. रजनीश सिंह यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “ भाजपाच्या या निर्णयामुळे मला धक्का बसला आहे. मला तिकीट का देण्यात आले नाही, यासंदर्भात मी पक्षातील वरिष्ठांशी बोलेनच, पण उमेदवारी दिली नाही म्हणून मी पक्षाचे काम करणार नाही, असे होणार नाही तिकीट का गमावले हे जाणून घेण्यासाठी मी पक्षाशी बोलेन. मी पक्षासाठी काम करत राहीन.” ५६ वर्षीय रजनीश सिंह यांनी १९८९ मध्ये राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. अनेक वेळा ते सरपंच म्हणून निवडून आले आहेत, तसेच भाजपामध्ये विविध पदेही भूषवली.
कासडोल आणि बेमेटारा जिल्ह्यातील बेमेटरा या जागेवर गेल्या निवडणुकीत भाजपाला काँग्रेसकडून पराभव पत्करावा लागला होता. या जागेकरिता पक्षाने नवीन उमेदवार निवडला आहे. कासडोलमध्ये धनीराम धिवार यांची तेलघाणी विकास मंडळाचे अध्यक्ष संदीप साहू यांच्याविरुद्ध लढत होणार आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदार शकुंतला साहू यांचे तिकीट संदीप साहू यांच्याकरिता नाकारण्यात आले. बेमेटारा येथे दिपेश साहू यांची काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार आशिष छाबरा यांच्यासह लढत होणार आहे.
भाजपाने बुधवारी आपली अंतिम यादी जाहीर केली, त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विधानसभेच्या ९० जागांसाठीही आपले उमेदवार घोषित केले आहेत.
२०१८ मध्ये काँग्रेसने ६८ जागा जिंकल्या होत्या आणि पोटनिवडणुकीनंतर एकूण जिंकलेल्या जागा ७१ होत्या. भाजपाने १५ जागा जिंकल्या होत्या. त्यातल्या दोन आमदारांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भाजपाकडे असणाऱ्या जागा अजून कमी झाल्या आहेत.