नागपूर : महाराष्ट्राला आता वेगळ्या उंचीवर नेण्याचे आमचे उद्दिष्ट असून महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील आणि योजना सुर ठेवल्या जातील, असे सांगून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशनानंतर दिला जाईल, अशी माहिती दिली.
मुंबई मेट्रो तीन प्रकल्पाचा बीकेसी ते कुलाबा हा दुसरा टप्पा मे २०२५ मध्ये सुरु होईल आणि मुंबईतील शासकीय जमिनींवरील गृहरचना संस्थांच्या वर्ग दोनच्या जमिनी मालकी हक्काने रूपांतरित करण्यासाठीच्या योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली. ‘मी आधुनिक अभिमन्यू असून विरोधकांचा चक्रव्यूह भेदून आल्याची कोपरखळी त्यांनी लगावली.
हेही वाचा >>>राम शिंदे यांच्या निवडीने जिल्ह्यात सत्ता समतोलाचा भाजपचा प्रयत्न
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांना फडणवीस यांनी आपल्या दीड तासाहून अधिक वेळ केलेल्या भाषणात सविस्तर उत्तर दिले. विरोधकांचे ईव्हीएमबाबतचे सर्व आक्षेप त्यांनी फेटाळले. देशात ईव्हीएमचा वापर कधी सुरू झाला, विधानसभा निवडणुकीत दर दोन तासांची आकडेवारी, ताशी सरासरी, आदी सर्व आकडेवारीसह तपशील देत व्हीव्हीपॅट म्हणजेच मतपत्रिकेद्वारे मतदान होत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. गेली अडीच वर्षे फडणवीस यांना विरोधकांनी टीकेचे लक्ष्य केले होते. माझ्या जातीचा उल्लेख करून कुटुंबीयांवरही बरीच टीका करण्यात आली. पण तरीही मी विरोधकांचा आभारी असून त्यामुळेच जनतेची सहानुभूती मला मिळाली. जात जेवढी जनतेच्या मनात असते, तेवढी जनतेच्या मनात नसते. विरोधकांनी जेवढा ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला, तेवढा समाज एकसंघ झाला. विरोधकांनी अनेक चक्रव्यूह माझ्यासाठी तयार केले, पण मी ते भेदून आलो. लोकसभेत विरोधकांच्या अपप्रचारला (फेक नॅरेटिव्ह) वस्तुस्थितीने ( थेट नॅरेटिव्ह) उत्तर दिले, असे फडणवीस यांनी नमूद केले.
‘भारत जोडो अभियाना’त शहरी नक्षलवादी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानात शहरी नक्षलवादी संघटना सक्रिय आहेत. या संघटनांचा संविधानावर विश्वास नाही, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. संविधानानुसार चालणारे निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि इतर संस्थांच्या विरोधात बोलणे आणि त्यांच्याविरुद्ध असंतोष निर्माण करणे हा या अभियानातील लोकांचा हेतू आहे. असे करणे म्हणजे राजद्रोह आहे. अशी कृत्ये करणाऱ्या संघटना शहरी नक्षलवादी आहेत, असे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले होते, असा दावाही फडणवीसांनी केला. देशात नक्षलवादी चळवळ संपायला आली आहे. त्यामुळे ते आता शहराकडे वळले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा >>>चार मंत्री असलेल्या सातारा जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी रस्सीखेंच
मुख्यमंत्र्यांनी सादर केलेली कविता
सोबत राहू एकदिलाने, घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने, समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…
उद्याोग, गुंतवणूक येतेय जोमात, बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ, तरुणाईचं स्वप्न कधी भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…
रस्ते, पूल, रेल्वेचे धागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे, गतीला स्थगिती मिळणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…
विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल, मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल, मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…
जलयुक्त शिवार देईल नवजीवन, नदीजोड प्रकल्प फुलवितील नंदनवन, राज्यात दुष्काळ कुठे दिसणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…
पाणंद रस्त्यांनी जोडू शेतशिवार, आनंदाचा शिधा देईल आधार, उपाशी पोटी कुणी झोपणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…
लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान, ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान, लाडक्या लेकी कधी दु:खी होणार नाही, अन् महाराष्ट्र आता थांबणार नाही…
असेल विरोधकांचे कमी संख्याबळ, सारे टिकवून ठेऊ लोकशाहीचे बळ कोणत्याही आमदाराचा मानसन्मान घटणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…
अजित पवारांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा
अजित पवार हे कायम (पर्मनंट) उपमुख्यमंत्री आहेत, अशी टिप्पणी केली जाते. पण तुम्ही मुख्यमंत्री व्हावे, अशा शुभेच्छा फडणवीस यांनी दिल्या. आम्ही तिघे एकत्र असून मुख्यमंत्री २४ तास उपलब्ध आहेत. पवार हे सकाळी सहा वाजताच आवरून कामकाज सुरू करतात. त्यामुळे सकाळी ८ ते चार पवार, दुपारी चार ते रात्री बारा मी आणि रात्री बारा ते सकाळी आठ कोण (एकनाथ शिंदे) काम करतात, हे सर्वांना माहीत आहे, असे फडणवीस यांनी सांगितल्यावर सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.