नागपूर : नागपूरच्या अंबाझरी उद्यानाचा विकास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणी प्रकल्प उभारणीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पेचात सापडले आहेत. प्रकल्पाच्या उभारणीची जबाबदारी असलेल्या कंपनीमागे पक्षातीलच विश्वासू आमदाराचे पाठबळ आहे तर प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांमध्ये विरोधी पक्षातील पण मित्रत्वाचे संबंध असलेल्या दुसऱ्या आमदाराचा समावेश आहे. त्यामुळे मैत्री सांभाळताना मुख्यमंत्र्यांची तारेवरची कसरत होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर चर्चा झाल्याने हा मुद्या पुन्हा ऐकदा ऐरणीवर आला आहे.
कधीकाळी नागपूरच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असलेले अंबाझरी उद्यान, तेथील तलाव आणि निसर्ग सैंदर्यामुळे नेहमी पर्यटकांच्या गर्दीमुळे फुलून गेलेले राहात असत. महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या या उद्यानाला राजकारण्यांची नजर लागली आणि हे उद्यान हळूहळू ओस पडू लागले आणि आता तर मागील काही वर्षांपासून सौंदर्यीकरण प्रकल्पल्पाच्या तिढ्यामुळे बंद आहे. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात हा प्रकल्प येतो.
पूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व खुद्द फडणवीस करीत होते. (ते दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात गेले.) सध्या पश्चिम नागपूरचे प्रतिनिधीत्व काँग्रेस आमदार विकास ठाकरे करतात. ते काँग्रेसचे आमदार असले तरी त्यांचे आणि फडणवीस यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.. ठाकरे हे अंबाझरी उद्यान विकास प्रकल्प व परिसरातील आंबेडकर स्मारक उभारणी प्रकल्प उभारणी करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. त्यांनी सध्या सुरू असलेल्या विधिंमंडळाच्या अधिवेशनात सध्या बंद असलेले उद्यान नागरिकांसाठी खुले करण्याची मागणी केली, ही झाली एक बाजू. दुसरी बाजू अशीच रंजक आहे.
अंबाझरी उद्यानाला विकसीत करून एक उत्तम पर्यटन स्थळ निर्माण करण्याच्या अनुषंगाने पाच वर्षापूर्वी तत्कालीन सरकारने हे काम एका खासगी कंपनीला दिले होते. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा या कामात पुढाकार होता. एमटीडीसीच्या सहकार्याने प्रकल्प राबवण्यात येणार होता.. कंपनीने जागेचा ताबा घेऊन कामालाही सुरूवात केली होती. तेथे महापालिकेने अनेक वर्षापूर्वी बांधलेले समाज भवन होते ते पाडण्यात आले. तेथून वाद सुरू झाला, त्याचे रुपांतर आंदोलनात झाले. त्यामुळे हा प्रकल्प रखडला.
दरम्यान लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली. या आंदोलनाचा फटका बसू नये म्हणून तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ ऑक्टोबर २०२३ ला उद्यान नागरिकांसाठी खुले करण्याचे आणि परिसरात आंबेटकर स्मारकाची उभारणी सरकारच्या माध्यमातून करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभेत केला.
प्रकल्प रखडला
अंबाझरी उद्यान विकास प्रकल्पासाठी नियुक्त, केलेल्या कंपनीचा कंत्राट रद्द केला तर पक्षातील आमदार नाराज होतो, शिवाय प्रकल्प रद्द झाल्याने चुकीचा संदेश जाऊ शकतो, दुसरीकडे संबंधित कंपनीचा कंत्राट रद्द केला नाही तर विरोधी पक्षातील मित्र असलेला आमदार नाराज होतो, असा पेच मुख्यमंत्र्यापुढे सध्या निर्माण झाला आहे. याचा फटका प्रकल्पाला बसला असून तो रखडला आहे. याचा परिणाम एका उत्तम उद्यानाच्या विकासावर झाला आहे. सर्वसामान्याने तेथे जाताही येत नाही.