मुंबई : विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांच्या माध्यमातून राज्यातील जनतेने महायुतीवर जो विश्वास दाखविला आहे तो सार्थ करण्यासाठी आम्ही जिवाचे रान करू. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी यापुढेही झटत राहू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी राज्यातील जनतेला दिली.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे राज्यातील मतदारांचे आभार मानले. विधानसभेच्या निकालात आपण शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या पदरात भरभरून दान दिले त्याबद्दल मतदारांना धन्यवाद देतानाच शिवसेनेसह महायुतीच्या घटक पक्षांवर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करण्यासाठी आम्ही जिवाचे रान करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार वाटचाल करणाऱ्या शिवसेनेला मतदारांनी दिलेला कौल हा गेल्या अडीच वर्षांत केलेल्या विकासामुळे मिळाला आहे. राज्यातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडका शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक यांनी शिवसेना महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केला आहे तो आम्ही कधीच विसरणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा >>>२१ जिल्ह्यांमध्ये काँग्रेसची पाटी कोरी

शिंदे यांच्या राजीनाम्याची औपचारिकता

१४व्या विधानसभेची मुदत आज, मंगळवारी संपत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर करतील. पुढील व्यवस्था होईपर्यंत राज्यपाल राधाकृष्णन हे शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडण्याची सूचना करतील. ही सारी तांत्रिक बाब आहे.

Story img Loader