मधु कांबळे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्ष यांची युती जाहीर करण्यात आली. निवडणुकांचे वारे वाहू लागले की अशा नव्या युत्या आघाड्यांची जुळवाजुळव सुरु होते. राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यानंतर वर्षा दीड वर्षावर लोकसभा आणि त्यानंतर सहा महिन्यांनी किंवा त्या आधी कधीही विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरु आहे. एकनाथ शिंदे-जोगेंद्र कवाडे यांची हातमिळवणी हा त्याचाच एक भाग असल्याचे मानले जाते.
एकानाश शिंदे यांचा शिवसेना गट आणि कवाडे यांचा रिपब्लिकन गट यांच्या युतीची एवढी चर्चा होण्याचे कारण काय. तर, निवडणुकांची चाहूल लागली की, रिपब्लिकन पक्षाचे विविध गट जागे होतात आणि मग कोणत्या तरी एखाद्या प्रस्थापित पक्षाबरोबर निवडणूक समझोता करण्यासाठी पुढे येतात. प्रस्थापित पक्षांनाही त्यांच्या प्रचारात एखादा तरी निळा झेंडा हवाच असतो. त्यामुळे काही मते मिळण्याची आशा असते. त्यामुळेच शिंदेंनी कवाडेंचे जाहीर स्वागत केले. आता रिपब्लिकन पक्षाचे दोन दिग्गज नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आधीच भाजपबरोबर हातमिळवणी केली आहे. दुसरे मोठे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती पक्की झाली आहे. जोगेंद्र कवाडे यांनी मग तिसरा पक्ष (गट) निवडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. कारण एका पक्षाबरोबर रिपब्लिकन नेचे स्वंतत्र रित्याही युती करु शकत नाहीत, हेही त्यातून दिसते आहे.
हेही वाचा >>> भाजप पाठोपाठ काँग्रेसचेही ‘मिशन बारामती’ ?
आता आगामी काळात होणाऱया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा पुढे येणाऱया लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदे-कवाडे युतीचा काय परिणाम होऊ शकतो का तर, त्याचे उत्तर होय असे देणे धाडसाचेच ठरेल. परंतु नाही म्हणायलाही काहीही धाडस लागणार नाही. जोगेंद्र कवाडे हे एकेकाळी आंबेडकरी चळवळीतील लढाऊ नेते होते. १९८० च्या दशकात मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनातून कवाडे यांचे स्वंतत्रपणे नेतृत्व पुढे आले. दलित पॅंथरचा झंझावात अजून थांबलेला नव्हता, अशा काळात नामांतर आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी दलित तरुणांना संघटित करुन दलित मुक्ती सेना ही लढाऊ संघटना उभी केली. त्यावेळी राज्यभर त्यांचे अनुयायी तयार झाले होते. पुढे त्यांनी काळ्या जगातील (अंडर वर्ल्ड) एक बडा तस्कर हाजी मस्तान यांच्याशी हातमिळवणी करुन दलित-मुस्लिम महासंघ स्थापन करुन निवडणुकाही लढविल्या होत्या. त्यामुळे तो त्यांचा राजकीय प्रयोग बराच वादग्रस्त ठरला होता.
हेही वाचा >>> तालुका निर्मितीचे आश्वासन हे राजकीय गाजर ?
पुढे आठ-दहा वर्षानंतर रिपब्लिकन गटांचे ऐक्य झाले, त्यात सर्व संघटना विलिन करण्यात आल्या. एकिकृत रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे एक नेते झाले. १९९९८ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर युती करुन रा.सू. गवई, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले व जोगेंद्र कवाडे हे चार नेते खासदार म्हणून निवडून गेले होते. परंतु पुन्हा पक्षात फाटाफूट झाली, कवाडे यांनी पीपल्स रिपब्लिकन हा स्वंतत्र गट तयार केला. मग कधी काँग्रेसबरोबर, कधी राष्ट्रवादीबरोबर युती करुन त्यांनी काही निवडणुका लढल्या व हारल्या. तरीही त्यांना सहा वर्षे विधान परिषदेवर जाण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे संधी मिळाली. आता त्यांनी सत्ताधारी शिंदे गटाशी युती केली आहे.
कवाडे यांचा राजकीय प्रभाव तसा फारसा राहिलेला नाही. तरीही आंबेडकरी चळवळीतील एक लढाऊ नेता म्हणून त्यांचा आदर केला जातो. परंतु राज्याच्या एखाद्या तरी भागात किंवा त्यांची कर्मभूमी असलेल्या नागपूरातही ते काही फारसा राजकीय प्रभाव पाडू शकणार नाहीत. तरीही शिंदे-कवाडे यांच्या युतीला आणखी एक शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आली अशी चर्चा सुरु झाली आहे. मुळात एकनाथ शिंदे यांचे सध्या तरी संपूर्ण राजकारण हे भाजपभरोसे आहे आणि आता कवाडे शिंदे यांच्यावर अवलंबून, अशी ही राजकीय युती आहे. निवडणुकीत शिंदे गटाला एका निळ्या झेंड्याची व्यवस्था झाली, त्याबदल्यात पुढे मागे कवाडे यांचीही काही तरी राजकीय व्यवस्था होईल, एवढाच या युतीचा अर्थ. त्यामुळे शिंदे-कवाडे एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही फरक पडणार नाही.