प्रतिभा सिंह, मुकेश अग्निहोत्री, सुखिवदर सिंह सुक्खू यांच्यात चुरस

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीटीआय, शिमला : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलेल्या काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळय़ात पडणार याविषयी तर्क लावले जात आहेत. प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह, निवडणूक प्रबंधन समितीचे अध्यक्ष सुखिवदर सिंह सुक्खू आणि ज्येष्ठ नेते मुकेश अग्निहोत्री यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी चुरस आहे. कौलसिंह ठाकूर, रामलाल ठाकूर आणि आशाकुमार हे नेतेही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात होते, मात्र या तिघांचाही निवडणुकीत पराभव झाला आहे.

माजी मुख्यमंत्री दिवंगत विरभद्र सिंह यांची पत्नी प्रतिभा सिंह या मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. राज्यातील वरिष्ठ नेते सुक्खू यांना मुख्यपत्रीपदी बसविण्याच्या विरोधात आहेत. प्रतिभा सिंह याच त्यांची पहिली पसंती असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्या खासदार असल्याने मुख्यमंत्री झाल्यास त्यांना पुन्हा निवडून यावे लागेल. विधानसभेत विरोधी पक्षनेते असलेले मुकेश अग्निहोत्री सलग पाच वेळा निवडून आले आहेत. तेही मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. ते मुख्यमंत्री झाल्यास ऊना जिल्ह्याला पहिला मुख्यमंत्री मिळेल. कांगडा जिल्ह्यातही काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या असल्याने या जिल्ह्यातील सुधीर शर्मा आणि माजी खासदार चंद्रकुमार यांचेही नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत.

हिमाचल प्रदेशातील जनादेशाचा विनम्रतेने स्वीकार करतो.  हिमाचलमध्ये ‘राज’ बदलले असले तरी ‘रिवाज’ही बदलला आहे. कारण आघाडीच्या दोन पक्षांच्या मतांमध्ये एक टक्क्यापेक्षाही कमी अंतर आहे. 

जे. पी. नड्डा, भाजपचे अध्यक्ष

देवभूमी हिमाचल प्रदेशातील जनतेने आमच्यावर विश्वास ठेवत आम्हाला भरघोस मतदान केले. याबद्दल जनतेचे मनापासून आभार. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रेने’ही या विजयात मोलाची मदत केली. आश्वासने पूर्ण करण्यास पक्ष कटिबद्ध आहे.

मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे अध्यक्ष

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister himachal pradesh assembly unprecedented success in elections congress ysh