पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स शिखर परिषदेच्या अखेरच्या (गुरुवार, २४ ऑगस्ट) दिवशी काही क्षण संवाद साधला. या बातमीनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी शुक्रवारी (ता. २५) केंद्र सरकारवर टीका करीत चीन सीमावादाच्या विषयाला पुन्हा तोंड फोडले. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (सैन्यदल) भारताची जमीन बळकावली असल्याचा आरोप गांधी यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘लडाखमधील एक इंचही जमीन चीनने ताब्यात घेतली नसल्याचे’ धडधडीत खोटे सांगत असल्याचेही ते म्हणाले.
“लडाख हे सैनिकी डावपेचाच्या अनुषंगाने मोक्याचे ठिकाण आहे. चीनने भारताची जमीन गिळंकृत केली, ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे. मात्र, विरोधी पक्षांच्या बैठकीत मोदी सांगतात की, चीनने लडाखमधील एक इंचही जमीन ताब्यात घेतलेली नाही. हे साफ खोटे आहे.”, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मागच्या आठवड्यात राहुल गांधी यांनी काही दिवस लडाखचा दौरा केला. गांधी यांनी लडाख ते कारगिल, असा दौरा मोटरसायकलवरून केला आहे. आज त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस असून, कारगिल युद्धातील वीर जवानांच्या स्मरणार्थ ‘कारगिल शहीद स्मारक’ येथे ते पुष्पहार अर्पण करतील.
हे वाचा >> ब्रिक्स’ गटात सहा नवे देश घेण्यामागे काय उद्देश? भारतासाठी याचा अर्थ काय?
कारगिलहून श्रीनगर येथे परतत असताना द्रास येथे ते स्थानिक लोकांशी संवाद साधण्यासाठी थांबणार आहेत. राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो ही पदयात्रा काढली होती. श्रीनगर येथे या पदयात्रेची समाप्ती करण्यात आली. त्यानंतर आता श्रीनगरच्या वरच्या भागात गांधी यांनी वेगळ्या पद्धतीने दौरा केला आहे.
“भारत आणि चीनचे संबंध सुधारण्यासाठी लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर शांतता प्रस्थापित होणे गरजेचे आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना केले”, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विनय ख्वात्रा यांनी गुरुवारी माध्यमांना दिली. चीनकडून उभय नेत्यांमधील या संवादाचे वर्णन ‘प्रामाणिक आणि सखोल’ असे करण्यात आले.
राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेची माहिती लडाख येथे दिली. ते म्हणाले, “काही महिन्यांपूर्वी आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर, असा प्रवास केला; त्याला भारत जोडो यात्रा असे नाव दिले. भाजपा-आरएसएसकडून देशभरात जो द्वेष, तिरस्कार पसरवला जात आहे, त्याविरोधात उभे राहण्याचा यात्रेचा उद्देश होता. ‘द्वेष-तिरस्काराने भरलेल्या बाजारात आम्ही प्रेमाचे दुकान उघडत आहोत’, असा संदेश घेऊन आम्ही लोकांपर्यंत गेलो. श्रीनगर आणि एकूणच काश्मीरमध्ये त्यावेळी बर्फवृष्टी होत असल्यामुळे मला लडाखला येता आले नव्हते. ही सल माझ्या मनात होती. त्यासाठीच यावेळी लडाखचा मोटरसायकलवरून दौरा काढण्यात आला.”
इतर नेते स्वतःच्या मनाची गोष्ट (मन की बात) बोलत असताना मी इथे तुमच्या मनातली गोष्ट जाणून घेण्यासाठी आलो आहे. यावरून मला एक बाब जाणवली की, लडाखच्या रक्तात आणि डीएनएमध्ये गांधीजी आणि काँग्रेसची विचारधारा भिनलेली आहे, असा खोचक टोला गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.
जम्मू आणि काश्मीर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विकार रसूल वाणी यांनी माहिती दिली की, काँग्रेस नेते राहुल गांधी दोन दिवसांच्या श्रीनगर दौऱ्यासाठी लडाखहून येत आहेत. इथे सोनिया गांधी आणि त्यांची भेट होईल. हा त्यांचा खासगी आणि कौटुंबिक दौरा असल्यामुळे या दोन दिवसांत पक्षाचा कोणताही नेता त्यांना भेटणार नाही किंवा त्यांच्याकडून कोणतीही राजकीय बैठक घेतली जाणार नाही.
राहुल गांधी १७ ऑगस्ट रोजी लडाख येथे आले. जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतरचा त्यांचा लडाखमधील हा पहिलाच दौरा आहे. ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरला विशेष प्रावधान देणारे कलम ३७० काढून टाकल्यानंतर या प्रदेशांना केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले होते. मागच्या सात दिवसांत राहुल गांधी यांनी लडाखमधील अनेक लोकप्रिय ठिकाणांना भेटी दिल्या.