बिहारमधील नेते चिराग पासवान यांनी एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. ते लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षाचे अध्यक्ष आहेत. आज (१८ जुलै) दिल्लीमध्ये एनडीएच्या घटकपक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. एनडीएमध्ये बिहारमधील एकूण पाच पक्ष सामील झालेले आहेत. त्यामुळे या पाचही पक्षांत भाजपा कसा समतोल साधाणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
लोक जनशक्ती पार्टीचे दोन गट
बिहारमधील लोक जनशक्ती पार्टीचे दोन गट आहेत. लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) आणि राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी (एनएलजेपी) अशी या दोन गटांची नावे आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटकपक्ष आहेत. राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीचे नेतृत्व हाजीपूरचे खासदार पशुपती कुमार पारस यांच्याकडे तर लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पार्टीचे नेतृत्व चिराग पासवान यांच्याकडे आहे. हे दोन्ही नेते एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये तणाव कमी करण्याचे आव्हान भाजपासमोर आहे.
भाजपा या दोन्ही पक्षांना कसे सांभाळून घेणार?
चिराग पासवान यांनी नुकतेच एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. चिराग पासवान त्यांचे काका पशुपती पारस यांच्यासोबत सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करण्यास सध्यातरी उत्सूक नाहीत. त्यामुळे भाजपा या दोन्ही पक्षांना कसे सांभाळून घेणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
चिराग पासवान यांना हव्यात ६ जागा
चिराग पासवान यांनी एनडीएमध्ये सामील होण्यापूर्वी आमच्या पक्षाला लोकसभेच्या सहा आणि राज्यसभेची एक जागा द्यावी अशी मागणी भाजपाकडे केली आहे. लोक जनशक्ती पक्षात फूट पडलेली नव्हती तेव्हा २०१९ साली या पक्षाला लोकसभेच्या ६ आणि राज्यसभेची एक जागा देण्यात आली होती. एनडीएमध्ये सामील होण्यापूर्वी भाजपाने जागावाटपाबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी चिराग पासवान यांनी भाजपाच्या नेतृत्वाला केली होती.
हाजीपूर मतदारसंघ ठरू शकतो वादाचे कारण
बिहारमधील हाजीपूर लोकसभा मतदारसंघ वादाचे कारण ठरू शकतो. कारण चिराग पासवान यांनी आमच्या पक्षाला ही जागा द्यावी, अशी मागणी भाजपाकडे केलेली आहे. तर या जागेवरून सध्या पशुपती पारस हे खासदार आहेत. ही जागा कायम लोक जनशक्ती पार्टी या पक्षाचा बालेकिल्ला राहिलेली आहे. दिवंगत नेते रामविलास पासवान यांचा या जागेवरून एकूण ९ वेळा विजय झालेला आहे. त्यामुळे याच जागेवरून चिराग पासवान किंवा त्यांच्या आई रीना पासवान निवडणूक लढण्यास उत्सुक आहेत.
“मीच त्यांचा खरा राजकीय वारसदार”
तर दुसरीकडे पशुपती पारस हेदेखील या जागेवर दावा सांगत आहेत. मला माझ्या भावाने हा मतदारसंघ दिलेला आहे, असे पशुपती पारस सांगतात. कोणत्याही परिस्थितीत मी ही जागा सोडणार नाही, अशी भूमिका पारस यांनी घेतलेली आहे. “जंगलात सध्या एकच सिंह आहे. माझा भाऊ त्यांच्या मुलापेक्षा (चिराग पासवान) माझ्यावर जास्त विश्वास ठेवायचा. मीच त्यांचा खरा राजकीय वारसदार आहे,” असे पारस सांगताना दिसतात. हाजीपूर ही जागा भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकते.
यावेळी राष्ट्रीय लोक समता पार्टीला कमी संधी?
बिहारमधील राष्ट्रीय लोक समता पार्टी हा पक्षदेखील एनडीएचा भाग आहे. या पक्षाने २०१४ साली सर्वच्या सर्व तीन जागांवर विजय मिळवला होता. मात्र बिहारमधील पाच पक्ष एनडीएचा भाग असल्यामुळे यावेळी या पक्षाला कमी जागा मिळण्याची शक्यता आहे.
हिंदुस्तानी आवाम मोर्चा जास्तीत जास्त जागा मागणार
माजी मुख्यमंत्री जिनत राम मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) हा पक्षदेखील एनडीएचा भाग आहे. या पक्षाचे मगध प्रदेशात वर्चस्व आहे. मात्र मागील काही निवडणुकीत हा पक्ष काही खास कामगिरी करू शकलेला नाही. असे असले तरी हा पक्ष जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे भाजपा या पक्षाला कशा प्रकारे समाधानी करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विकासशील इन्सान पार्टीला हव्यात दोन जागा
बिहारमधील विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) पक्षदेखील एनडीएचा भाग आहे. या पक्षाचे नेतृत्व मुकेश सहानी हे करतात. हा पक्ष दोन जागांवर निवडणूक लढवण्यास उत्सूक आहे. त्यामुळे भाजपा एनडीएतील कोणत्या घटकपक्षाला किती जागा देणार? बिहारमध्ये राजकीय संतुलन कसे साधणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.