२०२४ साली लोकसभेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा तसेच विरोधी पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. वेगवेगळे नेते आपल्या विचारधारेशी सुसंगत असणाऱ्या पक्षांशी युतीची शक्यता पडताळून पाहात आहेत. बिहारमधील नेते तथा लोक जनश्कती पार्टीचे (एलजेपी) राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी भाजपाचे नेते नित्यानंद राय यांची भेट घेतली आहे. या दोन नेत्यांमध्ये युतीबद्दल चर्चा झाली आहे. दरम्यान या बैठकीनंतर चिराग पासवान यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत २०२४ सालासाठी संभाव्य युतीवर चर्चा करण्यात आली.
चिराग पासवान यांना निर्णय घेण्याचा अधिकार
मागील काही दिवसांपासून चिराग पासवान राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच त्यांनी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते नित्यानंद राय यांची भेट घेतली. या बैठकीनंतर चिराग पासवान यांनी पक्षातील नेत्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “आगामी लोकसभा निवडणूक तसेच २०२५ साली होणारी बिहारची विधानसभा निवडणूक लक्षात घेता आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत युतीसंदर्भात चर्चा करण्यात आली. आमच्या पक्षातील नेत्यांनी मला युतीसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे,” असे चिराग पासवान यांनी सांगितले.
चिराग पासवान यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार?
दिल्लीला बैठकीसाठी रवाना होण्याआधी चिराग पासवान यांनी “युतीसंदर्भातील चर्चा अजूनही सुरूच आहे. मंत्री होणे हा माझा उद्देश नाही,” अशी प्रतिक्रिया दिली होती. तर भाजपासोबतच्या संभाव्य युतीसंदर्भात बोलताना सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे यावर आताच प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही, असे लोक जनशक्ती पार्टीचे एका खासदार म्हणाले होते. लोक जनशक्ती पार्टीने एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यास चिराग पासवान यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बैठकीनंतर भाजपाचे नेते काय म्हणाले?
चिराग पासवान यांच्यासोबतच्या बैठकीनंतर नित्यानंद राय यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “आम्ही जेव्हा एकमेकांना भेटतो, तेव्हा खूप छान वाटते. रामविलास पासवान आणि भाजपाने लोकांच्या कल्याणासाठी सोबत काम केलेले आहे,” असे नित्यानंदर राय म्हणाले.
“माझ्याविरोधात लढणाऱ्याची अनामत रक्कम जप्त होणार”
आगामी लोकसभा निवडणुकीत चिराग पासवान हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. यावरच रामविलास पासवान यांचे बंधू पशुपती कुमार पारस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पशुपती लोक जनशक्ती पक्षाच्या दुसऱ्या गटाचे नेतृत्व करतात. मी सध्या हाजीपूर मतदारसंघाचा खासदार आहे. माझ्या मोठ्या भावाने मला ही जागा दिलेली आहे. माझ्याविरोधात हाजीपूरमधून जो लढेल त्याची अनामत रक्कम जप्त होणार आहे, असे म्हणत पशुपती यांनी चिराग पासवान यांना लक्ष्य केले.
२०२० साली लोक जनशक्ती पक्षात फूट
दरम्यान, दलित नेते रामविलास पासवान यांनी लोक जनशक्ती पक्षाची स्थापना केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर २०२० साली या पक्षात फूट पडली. पशुपती पारस यांनी पाच खासदारांना सोबत घेऊन स्वत:चा दुसरा गट स्थापन केला. या पक्षफुटीनंतर चिराग पासवान यांच्या गटात ते स्वत: एकच खासदार आहेत.