लोक जनशक्ती पार्टीचे ( रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांनी ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या गोपालगंज आणि मोकमा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवाराचा प्रचार करणार असल्याची माहिती दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या भेटीनंतर चिराग पासवान यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ते पुन्हा एनडीएमध्ये जाणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
याबाबत बोलताना चिराग पासवान म्हणाले, ”गोपालगंज आणि मोकमा पोटनिवडणुकीत आमचा पक्ष भाजपा उमेदवारांचा प्रचार करणार आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. तसेच आगामी काळात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहे.”
हेही वाचा – नड्डा, शाह यांचा आदेश डावलला, हिमाचल प्रदेशमध्ये ५ माजी आमदारांसह एका बड्या नेत्याची हकालपट्टी
गोपालगंज आणि मोकमा या दोन्ही मतदारसंघातील जातीय समीकरणांचा विचार केला, तर भाजपासाठी ही पोटनिवडणूक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही जागांवर आरजेडी उमेदवार जिंकेल, असा अंदाज वर्कवण्यात येत आहे. दरम्यान, २०२० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत गोपालगंजच्या जागेवर भाजपाने, तर मोकमाच्या जागेवर आरजेडीने विजय मिळवला होता.
हेही वाचा – भारत जोडो यात्रेनिमित्त कोल्हापुरात अन्य पक्षांचीही मोट बांधण्याचा सतेज पाटील यांचा प्रयत्न
गोपालगंज आणि मोकमा या दोन्ही मतदारसंघात दलित मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे याठिकाणी भाजपाला चिराग पासवान यांची मोठी मदत होण्याची शक्यता आहे. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर बिहारच्या दलित राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या जनगणनेनुसार बिहारमध्ये १६ टक्के दलित मतदार आहेत. त्यामुळे चिराग यांना पुढे करून भाजपा ही मतं आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्नात आहे.
हेही वाचा – केरळ भाजपामध्ये नाराजीनाट्य! राज्य कोअर कमिटीत स्थान न दिल्यामुळे प्रदेश उपाध्यक्षांनी व्यक्त केली खदखद
दरम्यान, चिराग पासवान मागील काही दिवसांपासून युतीसाठी पक्षाच्या शोधात होते. मात्र, नितीश कुमार यांनी आरजेडी बरोबर युती केल्याने महागठबंधनमध्ये सात पक्ष झाले आहेत. तसेच यात तीन डाव्या विचारणीचे पक्षही आहेत. त्यामुळे पासवान यांच्यासाठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच सद्यस्थितीत बिहारच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला, तर भाजपाकडे युतीसाठी चिराग पासवन यांचा पक्ष हा एकमेव पर्याय आहे.