Chirag Paswan on Bihar Elections 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्री व लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. बिहारला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं सांगून त्यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. माझं राज्य मला हाक मारत असून, मी जास्त काळ केंद्रात राहू शकत नाही, असं पासवान यांनी म्हटलं आहे. माझे वडील रामविलास पासवान केंद्रीय राजकारणात अधिक सक्रिय होते. पण, बिहारला माझी पहिली प्राथामिकता आहे, असंही ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी बिहारच्या विधानसभा निवडणुकीवर आपलं लक्ष केंद्रित करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. “माझं लक्ष्य बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट ही संकल्पना आहे. माझं राज्य मला बोलावतंय,” असं पासवान म्हणाले होते. विशेष बाब म्हणजे यापूर्वीही ८ एप्रिल रोजी ‘एक्स्प्रेस अड्डा’ या कार्यक्रमात चिराग यांनी ‘बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट’ या संकल्पनेवर विश्वास असल्याचं सांगितलं होतं. “माझ्याकडे माझे (महिला आणि युवा) सूत्रदेखील आहे. लोक जनशक्ती पार्टीच्या पाच खासदारांपैकी दोन महिला खासदार आहेत. मी १४ कोटी बिहारींबद्दल बोलतोय. जेव्हा बिहारी लोक बिहारच्या बाहेर जातात, तेव्हा ते जात-पात विसरून प्रत्येक क्षेत्रात उत्तम कामगिरी करतात,” असंही पासवान म्हणाले होते.

चिराग पासवान विधानसभेची निवडणूक लढवणार?

मुलाखतीत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना चिराग म्हणाले होते की, माझे वडील (दिवंगत नेते रामविलास पासवान) यांना राष्ट्रीय राजकारणात अधिक रस होता; पण मी त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. मला स्वतःला राज्याच्या राजकारणात पाहायचं आहे. दरम्यान, बिहारच्या राजकारणात प्रत्यक्ष उतरण्याची किंवा विधानसभा निवडणूक लढविण्याची कोणतीही वेळ केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलेली नाही. तीन वेळा खासदार राहिलेले ४२ वर्षीय चिराग पासवान हे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्त्वाचे घटक आहेत. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री व जनता दल युनायटेड पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच ही निवडणूक लढवली जाईल, असं काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केलं होतं.

आणखी वाचा : Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या संभाव्य मनोमिलनावर कोण काय म्हणालं?

एनडीएसमोरील अडचणी वाढणार?

विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू होण्यापूर्वी रामविलास पासवान यांनी राज्याच्या राजकारणात रुची दाखवल्याने भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. एनडीएमधील मित्रपक्ष असलेल्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाने बिहारमधील २४३ जागांपैकी ४० जागांची मागणी केली आहे. पक्षाचे प्रमुख व केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी एका सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना ही मागणी केली आहे. विशेष बाब म्हणजे हिंदुस्थानी अवाम मोर्चाकडे फक्त एका खासदाराचे संख्याबळ असूनही त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.

लोक जनशक्ती पार्टीच्या एका नेत्यानं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं, “गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने आमच्या पक्षाला एक जागा कमी दिली होती. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला जास्त जागा देण्यात येतील, असं आश्वासनही त्यावेळी देण्यात आलं होतं. लोकसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पार्टीने १०० टक्के स्ट्राईक रेटने सर्वच पाच जागा जिंकल्या. त्यामुळे एनडीएनं या गोष्टीकडेही लक्ष द्यायला हवं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे बिहारमध्ये ४० पैकी ३० खासदार निवडून आले. जर विधानसभेच्या २४३ जागांची लोकसभेच्या ३० जागांमध्ये विभागणी केली, तर लोकसभेच्या एका जागेसाठी विधानसभेच्या आठ जागा मिळतात. या हिशेबाने आम्हाला ४० जागा मिळायला हव्यात.”

लोकसभा निवडणुकीत मिळालं मोठं यश

२०२१ मध्ये माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन झाल्यानंतर लोक जनशक्ती पार्टीमध्ये उभी फूट पडली होती. पक्षाची धुरा चिराग पासवान यांच्या खांद्यावर आल्यानंतर अनेकांनी त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाचही जागा जिंकून लोक जनशक्ती पार्टीने जोरदार पुनरागमन केलं. त्याच वेळी भाजपा आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडनं अनुक्रमे १७ पैकी १२ आणि १६ पैकी १२ जागा जिंकल्या. याउलट आरजेडी नेतृत्वाखालील महागठबंधनला केवळ नऊ जागांवरच समाधान मानावं लागलं.

पासवान यांनी बिघडवलं होतं जेडीयूचं गणित

दरम्यान, लोक जनशक्ती पार्टीनं २०२० ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी विधानसभेच्या एकूण १३५ जागा लढवल्या आणि त्यापैकी ११५ जागांवर जनता दल युनायटेडविरोधात उमेदवार दिले. त्यावेळी चिराग यांच्या या निर्णयामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप जेडीयूनं केला होता. या निवडणुकीत लोक जनशक्ती पार्टीला केवळ एका जागेवर विजय मिळाला असला तरी त्यांनी जेडीयूचं मोठं नुकसान केलं होतं. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूनं तब्बल ७१ जागा जिंकल्या होत्या. मात्र, २०२० मध्ये त्यांना केवळ ४३ जागाच जिंकता आल्या.

दुसरीकडे भाजपानं दमदार पुनरागमन करीत तब्बल ७४ जागा जिंकल्या. या निवडणुकीत लोक जनशक्ती पार्टीला ५.६६% मते मिळाली होती, जी राष्ट्रीय लोक समता पार्टी (१.७७%), सीपीआय (एमएल) लिबरेशन (३.१६%), विकासशील इन्सान पार्टी (१.५६%) व एचएएम-एस (०.८९%) या पक्षांपेक्षा जास्त होती. दरम्यान, चिराग पासवान यांनी बिहारची निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्यानंतर भाजपानं त्यावर प्रतिक्रिया दिली. “जोपर्यंत एखाद्या पक्षाला किमान १५% मतं मिळत नाहीत, तोपर्यंत ते स्वतःहून निवडणूक लढवण्याचं धाडस करणार नाहीत. चिराग पासवान यांना माहिती आहे की, २०२० च्या निवडणुकीत ते फक्त एक बिघाड करणारे ठरले होते. केंद्रीय मंत्री म्हणून ते आता चांगल्या स्थितीत आहेत. या टप्प्यावर पासवान हे कोणतंही धाडस करतील, असं आम्हाला वाटत नाही,” असं भाजपाच्या एका नेत्यानं म्हटलं आहे.

हेही वाचा : तमिळनाडूत स्टॅलिन यांच्यासमोर मोठं आव्हान? भाजपाला सापडली सत्तेची चावी?

पासवान यांच्या विधानावर भाजपाची प्रतिक्रिया काय?

चिराग पासवान यांचे नाव न घेता, भाजपाचे ज्येष्ठ नेते व बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा रविवारी पाटणा येथे माध्यमांशी बोलताना म्हणाले, “कोणताही अभिनेता बिहारचा मुख्यमंत्री होणार नाही. हे पद केवळ जमिनीवर काम करणाऱ्या नेत्यालाच मिळायला हवं.” उल्लेखनीय बाब म्हणजे चिराग पासवान यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात अभिनेता म्हणून केली होती. काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी अभिनय सोडला आणि ते राजकारणात सक्रिय झाले.

नितीश कुमार यांच्या जनता दल युनायडेट पक्षातील एका नेत्यानं म्हटलं, “२०२० मध्ये चिराग पासवान यांनी अनेक जागांवर आमचं नुकसान केलं होतं; पण यंदाच्या निवडणुकीत ते आमच्याबरोबर आहेत. त्यांच्या पक्षातील मतांचा आम्हाला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. २०३० च्या विधानसभा निवडणुकीत चिराग मोठी भूमिका बजावू शकतात. कारण- तोपर्यंत राज्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात आणि नव्या आघाड्याही तयार होऊ शकतात.” दरम्यान, चिराग पासवान हे बिहारच्या मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे. जर त्यांच्या पक्षानं विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, तर जागावाटपावरून भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत वाद होण्याची शक्यता आहे.