नीरज राऊत
पालघरचे पहिले पालकमंत्री तसेच माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या तृतीय स्मृती दिनाचे औचित्य साधून वाडा येथे आयोजित कार्यक्रमात पालघरची खासदारकी तसेच चार आमदार निवडून देणे हीच दिवंगत सावरा यांना श्रद्धांजली ठरेल , असा दावा भाजप नेत्यांनी केला. त्यामुळे पालघरच्या उमेदवारीबाबत भाजप आग्रही असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले.
विष्णू सावरा यांच्या ९ डिसेंबर रोजी असणाऱ्या स्मृतिदिनानिमित्त वाडा येथे आयोजित कार्यक्रमाला माजी आमदार मधु चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, पालघर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकुमार पाटील, ज्येष्ठ नेते बाबजी काठोळे, विष्णू सावरा यांचे चिरंजीव तसेच विक्रमगड भाजपा विधानसभा प्रमुख डॉ. हेमंत सावरा, भाजपा पालघर विधानसभा प्रमुख संतोष जनाठे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकज कोरे, सभापती संदीप पावडे, महिला जिल्हाध्यक्ष वीणा देशमुख, हरिश्चंद्र भोये, नरेश आक्रे आदी भाजपा पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा… धुळ्यात मालमत्ता करवाढीमुळे भाजपची कोंडी, अजित पवार गट आक्रमक
विष्णू सावरा यांनी आपल्या कारकीर्दीत वाडा, विक्रमगड, शहापूर, भिवंडी भागाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी त्या भागातील समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच पालघरचे पहिले पालकमंत्री म्हणून भूषविताना जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून उचललेली पावले याबद्दल आढावा मान्यवरांनी घेतला. समाजाला परिवर्तनाच्या दिशेने नेण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न माजी आमदार मधु चव्हाण यांनी व्यक्त केले. तर पक्षबांधणीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमधून आगामी निवडणुकीमध्ये पालघरची खासदारकी तसेच जिल्ह्यातील चार आमदार निवडून देणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे भरत राजपूत यांनी नमूद केले. बाबजी काठोळे यांनी सवरा यांनी ३५ वर्षाच्या केलेल्या कामाचा आढावा घेत व त्यांच्यासोबत काम करताना आलेल्या अनुभवांचे कथन केले. याप्रसंगी असमंत संस्थेच्या अध्यक्ष निशा सावरा आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा… नाना पटोलेंच्या ‘घरकुलां’वर परिणय फुकेंचे अतिक्रमण?
विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यात विधानसभा व लोकसभा संपर्क कार्यालयात कार्यशील करण्यात भाजपाने आघाडी घेतली असून मनोर येथे संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पालघरची खासदारकी मिळवण्याबाबत निर्धार व्यक्त करण्यात आला होता. पालघरची जागा सध्या शिवसेनेकडे असून ती भाजपाला मिळावी म्हणून वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू असून विष्णू सावरा यांना आदांजली वाहताना जिल्हाध्यक्ष यांनी केलेले सूचक विधान हे पालघरच्या जागेवर भाजपाने केलेल्या दाव्याचा पुनरुच्चार केल्याचे म्हणून बघितली जात आहे.
पालघरच्या लोकसभेच्या जागेसह विक्रमगड, डहाणू, बोईसर व नालासोपारा या विधानसभा क्षेत्रांवर भाजपाचा उमेदवार आगामी विधानसभेसाठी निवडून यावा यासाठी पक्ष बांधणी व प्रयत्न सुरू केले आहेत. जागा वाटप करताना याबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावर होणार असला तरी या जागांवर भाजपा तर्फे दावा करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने स्थानीय स्तरावर निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. – भरत राजपूत, जिल्हाध्यक्ष पालघर