अमरावती : विधानसभेसाठी जिल्ह्यात ६६.४० टक्के मतदान झाले. गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत हे लक्षणीय वाढले आहे. मतदान वाढीवर दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. वाढलेले मतदान महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात असली, तरी महायुतीच्या लाडक्या योजनांमुळे मतदानाचे प्रमाण वाढल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. महाविकास आघाडी वर्चस्व टिकवणार, की महायुती आघाडी घेणार, हे शनिवारी कळणार आहे.
या निवडणुकीत बंडखोरांनी राजकीय पक्षांची गणिते विस्कळीत केली आहेत. बडनेरा, अमरावती, दर्यापूर, मोर्शी, अचलपूर या मतदारसंघांमध्ये बंडाळीमुळे निकालावर काय परिणाम होऊ शकतो, याचे आडाखे बांधले जात आहेत.
हेही वाचा – देवेंद्र फडणवीस यांच्या ‘दक्षिण-पश्चिम’मध्ये मतदानात तीन टक्क्यांची वाढ
मुस्लीम आणि बौद्ध मतदारांचा कौल हा अनेक ठिकाणी महत्वाचा ठरणार आहे. अमरावती मतदारसंघात मुस्लीम मतांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा डोळा होता. हिंदू मतांचे विभाजन अटळ असल्याने ही एकगठ्ठा मते मिळावीत, यासाठी दोन्ही पक्षांनी भरपूर प्रयत्न केले. त्यातच सहा मुस्लीम उमेदवार रिंगणात होते. आझाद समाज पार्टी (कांशीराम) तसेच इंडियन युनियन मुस्लीम लीगच्या उमेदवारांनी किती मते खेचली, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष होते.
बडनेरात दलित, मुस्लीम आणि कुणबी (डीएमके) हा घटक प्रभावी ठरल्याची चर्चा रंगली. त्याचा काय प्रभाव पडला, हे निकालात दिसून येणार आहे.
दर्यापूर मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे), शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि युवा स्वाभिमान पक्षाचे रमेश बुंदिले यांच्यातील सामन्यात दलित आणि कुणबी मतदारांचा कौल निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. वंचित बहुजन आघाडीला कितपत प्रतिसाद मिळतो, याकडेही अनेकांचे लक्ष होते. मोर्शीत राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भाजप आणि काँग्रेसचे बंडखोर अशा चौरंगी सामन्यात जातीय समीकरणे महत्वाची ठरली. कुणबी मतांचे विभाजन कुणाच्या पथ्यावर पडले, हे निकालातून दिसून येणार आहे.
तिवसा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत झाली. डीएमके घटक आणि हिदुत्ववाद अशा या सामन्याचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो, याची उत्सुकता आहे. धामणगाव रेल्वे मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उपद्रवमूल्य किती वाढणार, याची चिंता महाविकास आघाडीसमोर होती. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला त्याचा फटका बसला होता. अचलपूर मतदारसंघातील तिरंगी सामन्यात तिसरी आघाडी मजबूत करणारे बच्चू कडू यांची काँग्रेस आणि भाजपसोबत लढत झाली. गेल्या काही निवडणुकांप्रमाणे यावेळीही जातीय समीकरणांचा प्रभाव दिसून आला आहे. मेळघाटमध्ये प्रहार, भाजप आणि काँग्रेस यांच्यातील मुकाबला हा लोकसभा निवडणुकीतील चित्र पुन्हा रंगवणार का, याची चर्चा रंगली आहे.