बिपीन देशपांडे लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्रपती संभाजीनगर- तीर्थक्षेत्र विकासासाठी तुळजापूर विकासासाठी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी १३८५ कोटींचा निधी मंजूर केल्यानंतरही तुळजापूर मतदारसंघात स्वागताच्या कमानी उभारण्याऐवजी संघर्ष पेटल्याचेच चित्र निर्माण झाले आहे. तुळजापूरकरांसह स्थानिक पुजारी मंडळ, व्यापाऱ्यांनी बुधवारी कडकडीत बंद पाळून प्रस्तावित विकास आराखड्यातील दर्शन मंडपासह इतर काही कामांवरून विरोधाचा सूर आळवला आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तुळजापुरातील मंदिर संस्थानच्या विकासासाठी तब्बल तेराशे ८५ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. यातून १३२८ कोटींची कामे केली जाणार आहेत. तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी वजन वापरून निधी मंजूर करून घेतला. तुळजापूर व धाराशिव तालुक्यासाठी मिळून एकूण पाच हजार कोटींचा निधी आणल्याबद्दल आमदार पाटील यांचा नुकताच सत्कारही करण्यात आला. यानंतर तुळजापुरात मंदिर संस्थानच्या विकास आराखड्यातील कामांवरून संघर्ष पेटला आहे.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये दीर व भावजयेत सुप्त संघर्ष

तुळजापुरातील मंदिराच्या महाद्वाराजवळ बरीच जागा शिल्लक आहे. पैकी त्यात विजय वाचनालय ट्रस्टच्या जागेचाही काही भाग आहे. त्याजागेत दर्शन मंडप करा, त्यामुळे महाद्वाराचे महत्त्व कमी होणार नाही, असे पुजारी मंडळाचे म्हणणे आहे. मात्र, प्रस्तावित विकास आराखड्यात घाटशीळ मार्गावर दर्शन मंडप उभारण्यात येणार असून तेथूनच एक हजार मीटरचा बोगदा करून त्यामाध्यमातून भाविकांना थेट मंदिरात आणले जाणार असल्याचे नमूद आहे. ही व्यवस्था पुजारी मंडळासाठी तसेच व्यापाऱ्यांसाठी अडचणीची असल्याने त्याला विरोध होत आहे. विकास आराखड्याच्या कामांबाबतही पुजारी मंडळ, व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचाही आरोप होत आहे. त्यातून तुळजापुरात बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. विकास आराखड्यात प्रशासनाने दर्शन मंडप, घाटशीळ वाहनतळाचा निर्णय बदलण्यात न आल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आता देण्यात आला असून मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर तेराशे ८५ कोटींच्या निधीनंतर तुळजापुरातला संघर्ष पेटल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा-नागपूर काँग्रेसमधील गटबाजी कधी संपणार? बैठकीतील गोंधळामुळे कार्यकर्ते संतप्त

विकास आराखड्यातून एकूण २८ कामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये मंदिरासाठीचे महाद्वार, सभामंडप, रामदरा तलावाजवळ १०५ फूट उंचीचे तुळजाभवानी देवीचे शिल्प, आकर्षक विद्युत रोषणाईसह ध्वनिवर आधारित प्रेक्षणीय चित्र, आदी कामे केली जाणार असल्याचा समावेश आहे. याशिवाय एक हजार मीटरचा बोगदा करून भाविकांना थेट मंदिरात प्रवेश मिळेल, अशी व्यवस्था असून त्यातून स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर घाटशीळ मार्गावर पूर्वी बीडकर तलाव होता, तेथेच वाहनतळ होते. तेथेच एक प्रतिकल्लोळ तयार केलेला आहे. त्यामध्ये हजार-दोन हजार भाविक आंघोळ करू शकतात, असा प्रशासनाचा विचार आहे. पुजारी मंडळासाठी हे अडचणीचे आहे. त्यामुळे दर्शन मंडप मंदिराजवळ पाहिजे, अशी मागणी पुजारी मंडळाची आहे.

तुळजापुरात कडकडीत बंद पाळून आंदोलन केल्यानंतर आमदार राणा पाटील यांनी तातडीने भूमिका जाहीर करून पुजारी मंडळ, नागरिक, व्यापाऱ्यांशी चर्चा करूनच विकास आराखड्यातील कामे केली जातील, असे स्पष्ट केले. विकास आराखडा अंतिम नसून सुधारित असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clash against bjp mla rana jagjeetsingh patil over temple development in tuljapur print politics news mrj