गणेश यादव, लोकसत्ता
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी लक्ष केंद्रित केले आहे. महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे रोहित पवार या काका-पुतण्यांचे शहरातील दौरे आणि संघर्षही वाढीस सुरुवात झाली. दोघांकडूनही एकमेकांवर अप्रत्यक्षपणे टीका केली जाऊ लागली आहे. त्यामुळे भविष्यात पवार-काका पुतण्यांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष पहायला मिळू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अजित पवारांच्या नेृत्वाखाली महापालिकेत राष्ट्रवादीची १५ वर्षांची सत्ता २०१७ मध्ये भाजपने हिसकावून घेतली. पण, आता अजित पवारच भाजपसोबत गेले असून राष्ट्रवादीत फूट पडली. आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह बहुतांश माजी नगरसेवकांनी अजितदादांना साथ दिली. सुरुवातीला तटस्थ राहणारे आणि पिंपरी विधानसभेत ताकद बाळगून असलेले ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी शरद पवारांना समर्थन दिले. त्यामुळे अजित पवार गटातील आमदार बनसोडेंची अडचण वाढली.
आणख वाचा-जयंत पाटील यांचे पुत्र लोकसभेच्या रिंगणात? पक्षाच्या नेत्यांची मागणी
अजित पवारांना बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घ्यायचा आहे. मित्र पक्ष भाजपच्या काळात विकासाची बिघडलेली घडी पुन्हा बसवायची असल्याचे सांगत त्यांनी काम सुरू केले आहे. कोणत्याही परिस्थितीत महापालिका निवडणूक जिंकण्याचा त्यांचा इरादा आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मागील दीड महिन्यात चारवेळा पवार शहरात आले. संघटनेचा आढावा घेत गटबाजी संपविण्याचे आदेश दिले. शहराच्या विकासासाठी मी कठोर निर्णय घेत सर्वांगीण विकास केला. आता काहीजण अधूनमधून शहरात येतात. वेगळ्या प्रकारचे वातावरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत पुतणे रोहित यांना टोला लगाविला.
दुसरीकडे शरद पवार यांनी शहरातील पक्षाची धुरा नातू रोहित पवार यांच्यावर सोपविली आहे. रोहित पवार सातत्याने शहरात येत असून वातावरणनिर्मिती करत आहेत. शहर कोणत्या व्यक्तीचे नव्हे तर जनतेचा बालेकिल्ला असतो असे सांगत काका अजित पवारांना आव्हान देत आहेत. जुन्या लोकांच्या भेटीगाठी घेत संघटनेचे काम सुरू केले आहे. तिकडे गेलेले अनेक जण परत येणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे पवार काका-पुतण्यातील राजकीय संघर्षांची सुरुवात शहरातून होत असल्याचे दिसून येत आहे.
आणखी वाचा-अजून एका प्रादेशिक पक्षाची वाटचाल फुटीकडे
शरद पवारांचेही लक्ष
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या शहरात लक्ष घातले आहे. महिन्याभरात पवारांनी दोनवेळा शहराचा दौरा केला. त्यामुळे राष्ट्रवादीकडून अजित पवार गटाला आव्हान दिले जात असल्याचे दिसून येत आहे.