मुंबई : मराठीमुळे देशाची सांस्कृतिक विविधता अधिक समृद्ध झाली आहे. त्यामुळे या भाषेचा अभिजात भाषा म्हणून करण्यात आलेला सन्मान हा संपूर्ण देशाने छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त केलेला मानाचा मुजरा आहे. आजचा हा दिवस मराठीसाठी सुवर्णक्षण असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे काढले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या केंद्राच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने अभिजात मराठी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वांद्रे- कुर्ला संकुलातील एनसीपीए सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात राज्य सरकारच्या वतीने पंतप्रधान मोदी यांचा सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यपाल सी. पी़ राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मराठी भाषामंत्री दीपक केसरकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> Narendra Modi In Thane : महाविकास आघाडी विकासाचा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीकास्त्र

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळल्याबद्दल महाराष्ट्र आणि जगभरातील मराठीप्रमींचे प्रारंभीच अभिनंदन करून मोदी यांची या वेळी मराठी भाषेच्या विविध क्षेत्रांतील योगदानाचा गौरव केला. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हे मराठीजनांचे स्वप्न साकारण्यात आपल्याला योगदान देता आले, याचा मनस्वी आनंद झाल्याचे सांगून मोदी यांनी मराठीसह बंगाली, पाली, आसामी भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल त्या भाषिकांचे अभिनंदन केले. मराठीचा इतिहास खूप समृद्ध आहे. या भाषेतून जे ज्ञानामृत निघाले, ते अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरले असून आजही ते आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

मान्यवरांची स्तुतिसुमने

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला दिवस हा राज्य स्थापनेइतका महत्त्वाचा असून मराठी माणसांचे राज्य मिळाले पण भाषेला अभिजात दर्जा नव्हता, ती मोठी उणीव भरून निघाल्याचे संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मारे यांनी या वेळी सांगितले. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल मराठी साहित्यकांच्या वतीने नामदेव कांबळे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी अनेक शतकांचा समृद्ध वारसा असणाऱ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही तिच्या महानतेची अधिकृत मान्यता असल्याचे सांगितले. अभिनेते सचिन पिळगावकर यांनीही पंतप्रधानांचे कौतुक केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Classical status is golden moment for marathi says pm narendra modi in mumbai print politics news zws