मुंबईः गेल्या काही वर्षांपासून सरकारी सेवा किंवा मंत्र्यांच्या सोबत राजकारणाचे धडे गिरविणाऱ्या अधिकारी, स्वीय सहाय्यकांना आता आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खाजगी सचिव बालाजी खतगावकर, विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे बाजीराव चव्हाण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे आदी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा मंत्रालयात रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात सन २०१४पासून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मंत्रालयात मुख्यमंत्री, मंत्र्यांकडे विशेष कार्यधिकारी म्हणून खाजगी व्यक्तींच्या नियुक्त्यांची प्रथा सुरू झाली आहे. त्यानुसार मंत्र्यांकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून कामाला लागायचे, राजकीय ओळखी वाढवायच्या आणि राजकारणाच्या माध्यमातून विधानभवनात प्रवेश करायचा अशी नवी प्रथा अलिकडच्या काळात रुजू लागली आहे. त्यातूनच मुख्यमंत्री किंवा मंत्र्याच्या माध्यमातून थेट विधिमंडळात पोहचणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पाच वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी, स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार थेट लातूर जिल्ह्यातील औसाचे आमदार झाले होते. यावेळीही ते निवडणूक लढवत आहेत. अशाच पद्धतीने मुख्यमंत्री सचिवालयातील श्रीकांत भारतीय विधान परिषदेत पोहचलेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर काही महिन्यांपूर्वी विधान परिषदेत पोहचले आहेत. त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी खतगावकर हे सुद्धा राजकारण सक्रीय झाले असून नांदेड जिल्ह्यातील मुखेड मतदार संघातून शिवसेनेकडून निवडणूक लढविणार असल्याचे सांगण्यात येते. मुखेड मतदार संघ भाजपच्या ताब्यात असून तेथून तुषार राठोड आमदार आहेत. पण या मतदार संघावर शिवसेनेने दावा केला असून खतगावकर यांनी मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव पदाचा राजीनामा देऊन या मतदार संघात प्रचारही सुरू केल आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदार संघातून इच्छूक आहेत. त्यांनी मतदार संघाची बांधणी आणि प्रचाराला प्रारंभही केला आहे. भाजपचे दादाराव केचे दोनवेळा या मतदार संघातून आमदार झाले असून पक्ष कोणाला तिकीट देतो हे महत्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे सोलापूर जिह्यातील करमाळा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे बाजीराव चव्हाण बीड मतदार संघातून लढण्यास उत्सूक असून ठाण्याचे पालकपमंत्री संभूराज देसाई यांनी त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : व्होट जिहाद’ आरोपातील फोलपणा उघड; मुस्लीमबहुल मतदारसंघांत भाजपच्याच मतांमध्ये वाढ

अशाच प्रकारे सेवानिवृत्त सनदी अधिकारी, श्यामसुंदर शिंदे, विजय नाहटा,संभाजी झेंडे, प्रभाकर देशमुख यंदा निवडणुकीच्या रिंगणार उतरण्याच्या तयारीत आहेत. शिंदे हे नांदेड जिल्हयातील लोहा-कंधार मतदार संघाचे आमदार आहेत. तर विजय नाहटा नवी मुंबईतून आणि झेंडे पुरंदरमधून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनाही सक्रीय राजकारणाचे वेध लागले असून आपल्या मुलाला लातूर जिव्ह्यातील उदगीर मतदार संघातून विधानसभेत पाठविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde and dcm devendra fadnavis personal secretary to contest vidhan sabha election 2024 print politics news css