शिंदे-फडणवीस यांची राज ठाकरेंबरोबर खलबते

महायुती सत्तेवर आल्यास मनसेला सत्तेतही सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचे सूत्रांनी नमूद केले.

Eknath shinde
शिंदे-फडणवीस यांची राज ठाकरेंबरोबर खलबते (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शनिवारी मध्यरात्री वरळीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेऊन राजकीय खलबते केली. शिवडी, वरळी आणि माहीम या तीन मतदारसंघांसह काही ठिकाणी महायुतीने पाठिंबा दिल्यास मनसेकडूनही अन्य ठिकाणी सहकार्य मिळण्याबाबत या नेत्यांची चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मनसेने लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा जाहीर केला होता. मात्र महायुतीबरोबर जागावाटप होत नसल्याने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा मनसेने केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर शिवडी मतदारसंघातून तर माहीममधून नितीन सरदेसाई निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील यांची उमेदवारी ठाकरे यांनी जाहीर केली. वरळीतून शिवसेना (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांना हरविण्यासाठी शिंदे-फडणवीस यांनी रणनीती आखली असून संदीप देशपांडे यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाकडून निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव मनसेला देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र त्यास राज ठाकरे सध्या तरी तयार नसल्याचे समजते.

हेही वाचा : नाराज, इच्छुकांची ‘सागर’वर भाऊगर्दी; पहिल्या यादीत नाव नसल्याने चिंता व्यक्त, बंडखोरी न करण्याचे फडणवीस यांचे आवाहन

मनसेला सत्तेत्त सहभागी करण्याचा प्रस्ताव

मनसेचे काही आमदार निवडून आणण्यास महायुतीने मदत केली, तर महायुतीला गरज असलेल्या मतदारसंघात उमेदवार उभे करून मनसेकडून उद्धव ठाकरे गट किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मतांचे विभाजन करून महायुतीच्या विजयाचा मार्ग सुकर करण्यास मदत केली जाईल, अशी शक्यता आहे. महायुती सत्तेवर आल्यास मनसेला सत्तेतही सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचे सूत्रांनी नमूद केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm eknath shinde and devendra fadnavis meet raj thackeray in midnight print politics news css

First published on: 22-10-2024 at 14:13 IST
Show comments