कोल्हापूर : एकीकडे कागलमध्ये महायुतीतील दोन बड्या नेत्यांतील विधानसभेचा संघर्ष तापू लागला असताना याच तालुक्यातील बिद्री साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाच्या कारवाईचे पडसाद शेजारच्या राधानगरी – भुदरगड मतदारसंघाच्या राजकारणावर उमटू लागले आहेत. बिद्री कारखान्याचे अध्यक्ष अजित पवार गटाचे माजी आमदार के. पी. पाटील या कारवाईमागे शिंदे सेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांचा हात असल्याचा आरोप केल्याने राजकारण तापले आहे. कारखाना चौकशीच्या या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह दिल्याची राजकीय चर्चा आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीला महायुती तसेच महाविकास आघाडीअंतर्गत निवडणुकीचा राजकीय संघर्ष होणार हे आतापासूनच दिसू लागले आहे. कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ व भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांच्यातील राजकीय संघर्ष धुमसत आहे. याच तालुक्यात असलेल्या दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यावरील कारवाई राजकीय वादाला निमंत्रण देणारे ठरली आहे.
हेही वाचा – ‘लाडकी बहीण’ बनण्यासाठी महिलांची धावपळ; कागदपत्रे मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयात गर्दी
बिद्री येथील या कारखान्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन दिवस तपासणी केली. मळी आणि मद्यार्काच्या साठ्यामध्ये तफावत आढळल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मळी उत्पादन व विक्री परवाना निलंबित करण्याचा आदेश लागू केला आहे. ही चौकशी लावण्यामागे आमदार प्रकाश आबिटकर यांचा हात आहे, असा आरोप अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केला आहे. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत दारुण पराभव केल्यामुळे अस्वस्थ झालेले आमदार अशी कारवाई करत आहेत. त्यांना ६५ हजार सभासद, मतदारसंघातील जनता जागा दाखवून देईल, अशी टीका केली आहे. पाठोपाठ पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार दिनकरराव जाधव, माजी आमदार बजरंग देसाई यांचे सुपुत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, ए. वाय. पाटील आदींनी राजकीय आकसातून बिद्री कारखान्यावर कारवाई करण्यावरून प्रकाश आबिटकर यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. याचा अर्थ या सर्व बड्या राजकीय शक्ती आबिटकर यांना धूळ चारण्यासाठी प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष एकवटत चालल्या असल्याने आमदारांची वाट आणखीनच काटेरी बनत चालली आहे. या आरोपाचा इन्कार आमदार आबिटकर यांनी केला आहे. अजित पवार यांच्या समवेत सत्तेत येऊन के.पी. पाटील यांनी बिद्रीमध्ये बेकायदेशीर १५० कोटींचे कर्ज घेऊन आसवनीची उभारणी केली आहे, असे प्रत्युत्तर दिले आहे. अखेर, या वादात मुख्यमंत्र्यांची सरशी झाली असून उपमुख्यमंत्री गटाला हात चोळत बसावे लागले आहे.
हेही वाचा – कोल्हापुरात तरुणाचा खून; दोन हल्लेखोर ताब्यात
लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसला ६५ हजारांवर भरभक्कम मताधिक्य मिळाल्याने के. पी. पाटील तसेच त्यांचे मेहुणे ए. वाय. पाटील हे काँग्रेसकडून विधानसभा लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यात के. पी. पाटील व ए. वाय. पाटील या दोघांनीही आवर्जून उपस्थिती लावल्याने भुवया उंचावल्या गेल्या. हे दोन्ही पाटील आपल्या सोबत असल्याचे विधान पवार यांनी केल्याने राजकीय संभ्रम आणखीनच वाढला आहे. के. पी. पाटील हे महाविकास आघाडीअंतर्गत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे राहणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा मतदारसंघ ठाकरे सेनेकडे असल्याने याबाबत मातोश्रीची भूमिका काय राहणार यावर चित्र अवलंबून असणार आहे. या घडामोडींमळे भुदरगडचा राजकीय गड ढवळून निघाला आहे.