आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला साथ देणाऱ्या ५० पैकी एकाही आमदाराचा पराभव होऊ देणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला असला तरी काही आमदारांचे ‘उद्योग’ तसेच मतदारसंघातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता सर्व आमदारांना पुन्हा निवडून आणण्याचे मोठे आव्हान शिंदे यांच्या समोर असेल.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला शिवसेनेच्या ४० आमदारांनी साथ दिली. याशिवाय अपक्ष व छोट्या पक्षांच्या दहा आमदारांचा शिंदे यांना पाठिंबा होता. गेल्या वर्षी बंडात शिंदे यांना एकूण ५० आमदारांची साथ लाभली. या सर्व ५० आमदारांना पुन्हा निवडून आणण्याचा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती तसेच आश्वासन दिलेल्या प्रत्येक आमदाराची मंत्रिमंडळात वर्णी लावणे शक्य नसल्याने आगामी निवडणुकीत निवडून आणण्याचा शब्द देऊन या आमदारांची नाराजी काही प्रमाणात दूर करण्याचा शिंदे यांचा हा प्रयत्न आहे.
हेही वाचा – समान नागरी कायद्यामुळे हिंदूंचीही अडचण होईल; द्रमुक पक्षाकडून विधी आयोगाला पत्र
शिंदे यांचा आपल्या आमदारांवर अजिबात वचक नाही हे वारंवार अनुभवास येते. अब्दुल सत्तार, भरत गोगावले, संजय शिरसाट यांच्यासारखे मंत्री वा आमदार स्वयंघोषित नेते झाले आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि कोणाचा समावेश करायचा हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. पण गोगावले व शिरसाट हे दोन आमदार आपला मंत्रिमंडळात समावेश होणार, असे गेले वर्षभर सांगत आहेत. गोगावले यांनी तर आपण रायगडचे पालकमंत्री होणार हे जाहीर करून टाकले. वास्तविक मुख्यमंत्री शिंदे यांनी या अशा आमदारांना चाप लावायला हवा होता. अब्दुल सत्तार हे कोणाबरोबर असतील त्याचे गोडवे गातात. शिवसेनेत प्रवेश केल्यावर उद्धव ठाकरे यांचे किती कौतुक केले होते. एकनाथ शिंदे यांना साथ दिल्यावर त्यांचे गोडवे गाण्यास सुरुवात केली. उद्या काही विपरित घडल्यास शिंदे यांच्यावर शाब्दिक प्रहार करण्यास सत्तार मागेपुढे पाहणार नाहीत. मराठवाड्यातील संतोष बांगर हे आमदारही त्यांच्या वर्तनाने वादग्रस्त ठरले आहेत. दादरसारख्या ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाचा कितपत निभाव लागेल याबाबतही साशंकता व्यक्त केली जाते.
हेही वाचा – भाजपचे १५२ जागांचे लक्ष्य, ही शिंदे-पवारांसाठी धोक्याची घंटा?
शिंदे यांना साथ देणाऱ्या शिवसेनेच्या अनेक आमदारांच्या वर्तनाने त्यांच्या मतदारसंघात नाराजी जाणवते. या साऱ्यांवर मात करून सर्व आमदारांना पुन्हा निवडून आण्याचे मोठे आव्हान शिंदे यांच्यासमोर असेल. सर्व आमदारांना निवडून आणण्याचा निर्धार करून शिंदे यांनी टाळ्या मिळविल्या असल्या तरी सत्तेच्या बळावर यापैकी काही आमदारांनी जो काही हैदोस घातला आहे हे लक्षात घेता हे आमदार पुन्हा निवडून येणे कठीण दिसते.