‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत शिवसेना आमचीच’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारंवार सांगत असले तरी ना नेतेमंडळी ना आमदारांवर शिंदे वचक बसवू शकलेले नाहीत. रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यातील वाद हे त्याचे ताजे उदाहरण मानले जाते.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर रामदास कदम यांनी शिंदे यांना साथ दिली. त्यांना विधान परिषदेच्या आमदारकीचे आश्वासन देण्यात आले होते, असे सांगण्यात येते. पण अद्याप तरी आमदारकी मिळालेली नाही. रामदास कदम यांना उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नाही म्हणून ते नाराज होते. त्यांचा मुलगा आमदार आहे. आता दुसऱ्या मुलाला खासदारकीचे वेध लागले आहेत. यातूनच त्यांचा कीर्तिकर यांच्याशी वाद झाला आहे. कीर्तिकर यांचा उल्लेख रामदासभाईंनी गद्दार असा केल्याने कीर्तिकर यांनी कदम यांनी पक्षाशी वेळोवेळी कशी गद्दारी केली त्याचे दाखले दिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत कोणी कोणालाच मानत नाही. यातूनच ही सारी परिस्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा : राजस्थान : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का, दोन मोठ्या नेत्यांचा भाजपात जाहीर प्रवेश!
मराठवाड्यात अब्दुल सत्तार हे कोणालाच गिनत नाहीत. त्यांचे कृषि खाते काढून घेण्यात आले तरीही त्यांच्यावर काहीही परिणाम झालेला नाही. संजय शिरसाट यांच्याशी त्यांचा वाद झाला. मंत्रिपद मिळत नसल्याने संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर तर गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रीपद हवे आहे. पण मंत्रिपदाचीच त्यांची इच्छा अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. मराठवाड्यातील संतोष बांगर या आमदारांबाबत काही न बोललेच बरे. त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना शिवीगाळ किंवा मारहाण केली. तरीही त्यांचे कोणीही वाकडे करू शकलेले नाही. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात अधिष्ठात्यांना स्वच्छतागृह साफ करायला लावले. त्याची चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित झाली. पण पाटील यांच्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
हेही वाचा : “सत्तेत आल्यास सक्तीच्या धर्मांतरावर बंदी,” राजनाथ सिंह यांचे आश्वासन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पक्ष संघटनेत वेगळी दहशत होती. उद्धव ठाकरे यांचीही पक्ष संघटनेवर पकड होती. या तुलनेत एकनाथ शिंदे आपल्या आमदार वा नेतेमंडळींवर वचक निर्माण करू शकलेले नाहीत.