ठाणे : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यातील निवासस्थानी रविवारी परतले असले तरी त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झालेली नाही. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोमवारी निवासस्थानीच विश्रांती घेतली असून यामुळे त्यांच्या सर्वच बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असले तरी आठ दिवस उलटूनही मुख्यमंत्री ठरू शकलेला नाही. तसेच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असून शिंदे हे गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. एकीकडे राज्यातील सरकार स्थापनेवरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असतानाच, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या धावपळीमुळे आराम करण्यासाठी शिंदे हे साताऱ्यातील दरे गावी गेले होते. तिथे त्यांची प्रकृती बिघडली. याबाबतची माहिती खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

‘विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत दररोज ८ ते १० सभा करत असल्याने प्रचंड धावपळ झाली होती. यातून थोडासा आराम करण्यासाठी दरे मुक्कामी आलो असून आपली तब्येत बरी नसल्याचे शिंदे यांनी सांगितले होते. दरे गावात विश्रांती घेतल्यानंतर रविवारी ते ठाण्यातील निवासस्थानी परतले. सोमवारी ते पुन्हा पक्ष आणि महायुतीच्या बैठकांमध्ये सक्रिय होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु सोमवारीही त्यांची प्रकृती ठीक नव्हती. यामुळे त्यांनी दिवसभरातील बैठका रद्द करून घरीच विश्रांती घेतली.

हेही वाचा >>> चावडी :ओसाड गावची पाटीलकी

शिंदे यांचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे

मुंबई: शिवसेना कोणाची हे एकनाथ शिंदे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. हे एक मोठे यश आहे. निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी एक होऊन काम केले असले तरी ही लढाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. त्यामुळे आमच्या नेत्यांचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे, अशी अपेक्षा शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. शिंदे नाराज आहेत या तर्कवितर्कांना आता तरी पूर्णविराम द्या, अशी विनंती केसरकर यांनी केली.

शिंदेंनी सत्तेच्या बाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता

अलिबाग : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो, असे जाहीर केले होते. मात्र आम्ही त्याला विरोध केला, त्यांनी सत्तेत राहून काम करावे असा आग्रह आम्ही सगळ्यांनी केला असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले. गोगावले महाड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात सत्तास्थापनेत कुठलाच अडसर नाही. संजय राऊत किहीही बोलले तरी महायुतीचे सरकार येणार, तिन्ही पक्षात कुठलीही कटुता नाही. त्यामुळे जे काही होईल ते चांगलेच होईल. ज्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो, त्याने सत्ता स्थापन कधी करायची हे ठरवायचे असते. दिल्लीत तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतरच निर्णय घेण्यात आला, त्यामुळे सत्ता स्थापन करताना मित्रपक्षांना विश्वासात घेतले नाही हे म्हणणे अयोग्य असल्याचे गोगावले यांनी सांगितले.

अजित पवार दिल्लीत

सत्तास्थापनेच्या हालचाली वाढल्या असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सोमवारी रात्री नवी दिल्लीत दाखल झाले. महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीला चांगली खाती मिळावीत व मंत्रीपदे अधिक मिळावीत, अशी पवार यांची भूमिका आहे. महायुतीला बहुमत मिळताच अजित पवार यांनी लगेचच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी भूमिका मांडली होती. शिंदे यांनी गेले चार दिवस फारच ताणून धरल्याने भाजपचे नेतृत्व अजित पवारांना झुकते माप देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘माझ्या उपमुख्यमंत्रीपदाबाबतच्या बातम्या निराधार’

ठाणे : ‘‘मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या गेले दोन दिवस प्रश्नचिन्हे टाकून प्रसिद्ध केल्या जात आहेत. वस्तुत: यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्रीपदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही, अशी माहिती शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. याबाबत त्यांनी आपल्या ‘एक्स’ या समाजमाध्यमावर मजकूर पोस्ट केला.

राज्यात २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण, याबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या. काही दिवसांपूर्वी सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील भाजप वरिष्ठ मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असल्याचे सांगून भाजपचा मुख्यमंत्रीपदाबाबतचा मार्ग मोकळा केला. मात्र यानंतर उपमुख्यमंत्रीपदी त्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव चर्चेत आले. तसेच एकनाथ शिंदे यांनी रविवारी त्यांच्या मूळ गावी दरे येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी शिंदे यांनी सध्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले. असे असतानाच आता स्वत: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून त्यांच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde s meetings canceled today due to health issue print politics news zws