भाईंदर : भाईंदर मतदारसंघातून तिकिट मिळविण्यासाठी माजी आमदार नरेंद्र मेहता आणि विद्यमान आमदार गीता जैन यांच्यासह भाजपाच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच असताना आता शिवसेनेने ( शिंदे ) या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यामुळे भाजपच्या गोट्यात अस्वस्थता पसरली असून पुन्हा मिरा भाईंदरमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद पेटण्याची शक्यता आहे.

मीरा भाईंदर शहरात गुजराती-जैन-मारवाडी नागरिकांचे प्रमाण वाढल्याने गेल्या काही वर्षांपासून हा भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. विद्यमान आमदार गीता जैन आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष रवी व्यास निवडणुकीसाठी ईच्छुक आहेत. त्यांच्यात तिकिटासाठी रस्सीखेच सुरू असतानाच या मतदार संघावर आता शिवसेना शिंदे गटानेही दावा सांगितला आहे. मिरा-भाईंदरमध्ये उमेदवारीवरून भाजपच्या गोटात सुरू असलेल्या चढाओढीचा फायदा घेऊन ही जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे समजते. शिवसेना शिंदे गटाने ठराव करून शिवसेना विधानसभा प्रमुख विक्रम सिंह यांचे नाव सुचवले आहे. जिल्हाध्यक्ष राजू भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विक्रम सिंग यांच्या नावासंयांसदर्भात पत्र पाठवले आहे. शिवसेना शिंदे गटाकडून या मतदार संघात राजकीय बांधणी सुरू करण्यात आली आहे. मतदार संघातील आगरी-कोळी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यात सामाजिक मंडळांना देणगी देण्यात येत असल्याची बाब मागील काही वर्षांपासून घडत आहे. तर नुकतेच आई धारावी देवी मंदिराच्या पुनर्विकासाला आमदार प्रताप सरनाईकांकडून २५ लाखाची देणगी देण्यात आली होती. याशिवाय शिवसेनेतून इच्छुक उमेदवार म्हणून काम करत असलेले विक्रम प्रताप सिहं उत्तर भारतीय मतदारांना एकत्र आण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा : जेवणात थुंकी, लघवी मिसळल्यास आता तुरुंगवास होणार; योगी सरकारचा नवीन अध्यादेश काय आहे?

भोईर यांचे हे पत्र समोर येताच भाजपच्या गोट्यात अस्वस्थता पसरली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपचा उमेदवार देण्याची मागणी मिरा भाईंदर भाजपने केली होती. मात्र ऐन वेळी ही जागा आपल्याकडे कायम ठेवण्यात शिंदे यांना यश आले होते. यावेळी शिवसेना पक्ष भाजपला कमजोर करत असल्याचा आरोप माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी केला होता. परिणामी निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली होती. शिवसेना शिंदे गटाने लोकसभा घेतल्यानंतर आता मिरा भाईंदर विधानसभा मतदारासंघावरही दावा केल्याने स्थानिक पातळीवरील भाजप नेत्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर हा भाजपचा बालेकिल्ला असून येथून भाजपचाच उमेदवार निवडणुक लढेल, अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी दिली आहे.

हेही वाचा : Uttar Pradesh Politics: उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष अन् भाजपात वाद का पेटला? चर्चेत आलेले जेपी सेंटर नेमके काय आहे?

गीता जैन यांच्या भूमिकेविषी संभ्रम

शिवसेना शिंदे गटाने या मतदारसंघावर दावा सांगितला असला तरी शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या आमदार गीता जैन यांच्याभूमिकेविषयी मात्र संभ्रम आहे. मूळ भाजपाच्या असणार्‍या गीता जैन यांना २०१९ मध्ये पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि भाजपाच्या नरेंद्र मेहता यांचा १५ हजार ५२६ मतांनी पराभव केला. निवडून आल्यानंतर जैन यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी शिवसेनेची साथ धरली. शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच जैन यांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला. परंतु मात्र त्या कधी भाजपच्या बैठकांना तर कधी शिवसेनेच्या कार्यक्रमांना उपस्थित असतात. प्रत्येकाला उमेदवार म्हणून मागणी करण्याचा अधिकार आहे. शेवटी निर्णय वरिष्ठ घेतील.मी अपक्ष म्हणून निवडणुक लढवली होती.आणि आताही महायुती धर्माचे पालन करेने असे गीता जैन यांनी सांगितले.