ठाणे : उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील ताकदीला सुरुंग लावण्यासाठी शाखाशाखांमधून संपर्क अभियानाचा प्रयोग केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डाॅ.श्रीकांत यांनी आता ग्रामीण महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी शेतकरी संवादाचा नवा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये यंदा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील टेंभी नाका येथून गुरुवारी या यात्रेला भगवा झेंडा दाखवित मुख्यमंत्र्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोहचा असा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
राज्य सरकारमार्फत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरु असलेले ‘शासन आपल्या दारी’ आणि मुंबईत पक्षीय स्तरावर हाती घेण्यात आलेले ‘शाखा संपर्क’ अभियानानंतर पक्ष विस्तारासाठी शिंदे सेनेने आखलेला हा तिसरा महत्वकांक्षी कार्यक्रम मानला जात आहे. शिवसेनेतील फुटीनंतर ४० आमदार आणि १३ खासदारांची फौज सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. राज्य सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी होण्यापुर्वी कृषी मंत्रीपद शिंदे गटाच्या अब्दुल सत्तार यांच्याकडे होते. ग्रामीण महाराष्ट्राशी आणि त्यातही थेट शेतकऱ्यांपर्यत कशाप्रकारे पोहचता येईल याविषयी शिंदेसेनेत गेल्या काही काळापासून खल सुरु होता. अखेर शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून शेतकरी, सरकार आणि पक्ष असा नवा सेतू बांधण्याचा प्रयत्न शिंदे सेनेकडून केला जात असून पुढील महिनाभर राज्यातील ३४ जिल्ह्यांमधून निघणाऱ्या या यात्रेमागे खुद्द मुख्यमंत्र्यांनी पुर्ण पाठबळ उभे केल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा : ‘इंडिया’ आघाडीचे भवितव्य धोक्यात ? काँग्रेस आणि आपमधील दरी रुंदावली
मुख्यमंत्र्याची शिवसेना थेट बांधावर
अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर ठाण्यातील टेंभी नाका येथून मुख्यमंत्र्यांनी भगवा झेंडा दाखवित या शेतकरी संवाद यात्रेचा शुभारंभ केला. उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी नव्याने संघटना बांधण्यावर भर दिला असून शिवसेना प्रणीत नव्या शेतकरी सेनेची बांधणी सुरु केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील धनजंय जाधव आणि नायराव कराड या दोन शेतकरी नेत्यांकडे या संघटनेची सुत्र सोपविण्यात आली असून या संवाद यात्रेच्या आयोजनाची आखणीही या नेत्यांमार्फत केली जात आहे. राज्यातील अनेक भागात पुरेसा पाउस झालेला नाही. काही भागात दुष्काळ तर काही तालुक्यांमध्ये अती पावसामुळे यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरु शकतो.
हेही वाचा : म्यानमारच्या निर्वासितांची बायोमेट्रिक तपासणी करणार नाही; मिझोरामच्या सरकारने केंद्राचे आदेश धुडकावले
यामुळे निवडणुकांच्या काळात शेतकऱ्यांमधील अस्वस्थताही टोकाला पोहचू शकते. हे लक्षात घेऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यत जाऊ असा दावा करत या यात्रेची आखणी करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यांमधील ४ ते ५ गावांची निवड करुन तेथील बांधावर लहानगी बैठक घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेणे, वेळप्रसंगी थेट मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांची ऑनलाइन संवाद साधून देणे, शासकीय यंत्रणांमार्फत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे अशी आखणी या यात्रेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. पक्षाच्या त्या-त्या भागातील खासदार, आमदारांनाही या यात्रेत सहभागी व्हावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्व नसेल तर लोकशाहीला काहीही अर्थ नाही; काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया
‘राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला जाणार आहे. विरोधी पक्षातील नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जातात हे नवे नाही. मात्र सत्तेत असतानाही मुख्यमंत्र्यांनी पक्ष संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी हे नवे व्यासपिठ उभे केले आहे. शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न समजून घेणे, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची त्याना थेट माहिती देणे, नाविन्यपूर्ण शेतीबाबत अवगत केले जाणार आहे. नाशीक पासून सुरु होणाऱ्या या यात्रेचा यात्रा संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करुन नगर जिल्ह्यातील पुणतांबा भागात समारोप होईल’, असे नाथराव कराड (समन्वयक शेतकरी संवाद यात्रा) यांनी म्हटले आहे.