जयेश सामंत, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या लोकसभा मतदारसंघांवर दावा करत महायुतीच्या जागा वाटपात थेट मुख्यमंत्र्यांची कोंडी करू पाहणाऱ्या भाजपावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आता शिंदे सेनेत सुरू झाला आहे. भाजपने केलेल्या सर्वेक्षणात ठाण्याची जागा कमळ चिन्हावर लढल्यास विजयाची खात्री असल्याचा दावा या पक्षाकडून सातत्याने केला जात असून त्यामुळेच मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढविला जात असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. भाजपाचे हे वाढते दबावतंत्र लक्षात घेऊन मुख्यमंत्री समर्थकांनी गेल्या काही दिवसांपासून ठाणे नवी मुंबई, मीरा-भाईंदर या शहरांमध्ये जाहीर बैठकांचा सपाटा लावला असून काहीही झाले तरी, कल्याण शिवसेनेकडेच राहू द्या अशी मागणी करत भाजपावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा >>> इंडिया आघाडीत आणखी एक गोंधळ; महबूबा मुफ्ती यांच्याविरुद्ध नॅशनल कॉन्फरन्सने दिला उमेदवार

शिवसेनेतील बंडा नंतर मुख्यमंत्र्यांसमवेत आलेले तेरा खासदार आणि ठाण्याची एक जागा अशा १४ जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने महायुतीच्या जागा वाटपात प्राधान्याने मागितल्या आहेत. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण यांच्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही शिंदे सेनेने प्रतिष्ठेची केली आहे. याशिवाय संभाजीनगर आणि धाराशिव अशा आणखी दोन जागा पदरात पडाव्या यासाठी प्रयत्न केले जात आहे. महायुतीच्या जागा वाटपात मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला १० पेक्षा अधिक जागा मिळणार नाही असे चित्र सुरुवातीला उभे करण्यात आले होते. असे असले तरी बैठकीच्या अंतिम टप्प्यात किमान १४ ते १५ जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत. मुख्यमंत्र्यांची ही वाढती मागणी लक्षात घेता भाजपने ठाणे आणि कल्याण या दोन जागांपैकी एका जागेवर दावा करत शिंदे सेनेला काहीसे बॅकफूटवर ढकलले आहे. या दोन्ही जागा एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नावाने एकनाथ शिंदे यांचं राजकारण चालतं. आनंद दिघे यांनी एकेकाळी हा लोकसभा मतदारसंघ भाजपच्या पदरातून खेचून आणला होता. शिंदे मुख्यमंत्री असताना मतदार संघ भाजपाला देणे म्हणजे गुरुने जे कमावले शिष्याने ते गमावले अशी टीका ओढवून घेण्यासारखे ठरणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात आणि विशेषतः ठाणे परिसरात आनंद दिघे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. विद्यमान खासदार राजन विचारे हे देखील आनंद दिघे यांचे शिष्य आहेत. ठाणे लोकसभेची जागा भाजपाच्या ताब्यात गेली तर, राजन विचारे यांच्या हाती एक मोठा मुद्दा लागेल. महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या चिन्हावर भाजपामधून आयात केलेले संजीव नाईक यांना उमेदवारी द्यावी असा आणखी एक प्रस्ताव भाजपा ने मुख्यमंत्र्यांना पुढे ठेवला आहे. यामुळे शिंदे यांची दुहेरी कोंडी झाली आहे.

हेही वाचा >>> बिहारमध्ये माय-बाप ठरणार वरचढ, की एनडीएची सरशी?

आनंद दिघे यांच्या हयातीत त्यांनी संजीव नाईक यांचे वडील आणि राज्याचे माजी मंत्री गणेश नाईक यांचा सिताराम भोईर अगदी सामान्य शिवसैनिकाच्या माध्यमातून पराभव घडवून आणला होता. ज्या नाईकांना पाडण्यासाठी आनंद दिघे यांनी जीवाचं रान केले त्याच नाईक यांच्या मुलाच्या पुनर्वसनासाठी शिंदे यांनी आपली तलवार म्यान केल्याच्या टीका त्यांच्यावर होऊ शकते. शिंदे यांच्या निकटवर्ती यांनी या दोन्ही बाबी त्यांच्या कानावर घालत याबाबत चिंता व्यक्त केल्याचे समजते. हे दोन्ही प्रयोग एकनाथ शिंदे यांच्या अंगलट येऊ शकतात अशी भीती त्यांच्या समर्थकांना आहे. दरम्यान भाजपाने एकनाथ शिंदे यांना दिलेल्या प्रस्तावानुसार कल्याण किंवा ठाणे या दोन लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ भाजपाला मिळावा हा आग्रह अजूनही कायम ठेवण्यात आला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षापासून शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत हे खासदार असून राज्य सरकार मार्फत या भागात शेकडो कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. हा मतदारसंघ बांधण्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी गेल्या काही वर्षापासून पद्धतशीर नियोजन सुरू केले असून भाजप मनसे या पक्षांच्या स्थानिक नेत्यांनाही त्यांनी अंगावर घेतले आहे. इतकी मेहनत केल्यानंतर कल्याण भाजपाला देणे हे श्रीकांत यांना मान्य नाही. शिंदे सेनेची नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन भाजपने ही गुगली टाकल्याचे सांगितले जात आहे. ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागा एकनाथ शिंदेंसाठी दुखरी नस असून ती दाबल्याने इतर ठिकाणचा त्यांचा आग्रह कमी होईल अशी खेळीही यामागे असू शकते असे शिंदे समर्थकांचे म्हणणे आहे. ठाणे कल्याण या दोन मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ जरी भाजपाला सोडावा लागला तरी मुख्यमंत्र्यांना आपल्या जिल्ह्यात भाजपाचे आव्हान भविष्यात स्वीकारावे लागेल असे चित्र आहे. यापासून शिंदे सेनेने गेल्या काही दिवसांपासून ठाणे, नवी मुंबई मीरा-भाईंदर या शहरांमध्ये वेगवेगळ्या बैठकांचे आयोजन करत शक्ती प्रदर्शन सुरू केले असून मतदार संघ शिवसेनेलाच मिळावा असा आग्रह या पक्षाचे दुसऱ्या फळीतले नेते धरू लागले आहेत. विशेष म्हणजे या बैठकांना मुख्यमंत्री अथवा त्यांचे पुत्र श्रीकांत हे जाणीवपूर्वक अनुपस्थित राहत असल्याचे चित्र आहे. मात्र, पक्षाचे काही मंत्री नेते पदाधिकारी या मेळाव्यांना उपस्थित राहत शिवसेनेचे चिन्ह आणि शिवसेनेचाच उमेदवार असा आग्रह धरताना दिसत आहे. महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत दबाव निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde supporters holding public meetings to create pressure on bjp for thane lok sabha seat print politics news zws