दिगंबर शिंदे
सांगली : शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इस्लामपूर दौरा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाला. लोकसभेसाठी हातकणंगले मतदार संघात विद्यमान खासदार धैर्यशील माने पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत असताना मुख्यमंत्री शिंदे यांचा इस्लामपूर दौरा शासकीय पातळीवर यशस्वी ठरला असला तरी राजकीय पातळीवर अपेक्षाची पूर्ती करणारा होता असे दिसले नाही. या कार्यक्रमासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री यांची गैरहजेरी होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारची कामगिरी मतदारांपर्यंत विशेषत: महिलापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला असला तरी ज्या घाईगडबडीने कार्यक्रम उरकण्यात आला, त्यामुळे राजकीयदृष्ट्या हा दौरा प्रभावहिन ठरला असेच म्हणावे लागेल.
मुख्यमंत्री शिंदे हे सातत्याने कोल्हापूर, सातारा दौर्यावर येतात. मात्र, सांगलीला जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच वाट वाकडी केली. मुळात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम विट्यात घ्यावा असा आग्रह खानापूर-आटपाडीतील बाबर गटाने धरला होता. कारण आमदार अनिल बाबर यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेल्या या गटाला राजकीय वरदहस्त आजही कायम आहे हे सांगण्याची नामी संधी शिवसेनेला मिळाली असती, मात्र, लोकसभा निवडणुक नजरेसमोर ठेवून खासदार माने यांचा मतदार संघ असलेल्या इस्लामपूरमध्ये हा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्हा पातळीवरून लाभार्थी गोळा केले होते. यामध्ये प्रामुख्याने महिलांची संख्या अधिक होती.
हेही वाचा >>> रामदास कदम यांचे एवढे उपद्रवमूल्य का ?
खा. माने यांच्याबद्दल गत वेळची स्थिती इस्लामपूर आणि वाळवा विधानसभा मतदार संघात दिसत नाही. गेल्यावेळी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या युतीने लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळीही तीच स्थिती असली तरी यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षात विभाजन झाले असून त्याचाही परिणाम या निवडणुकीत दिसून येणार आहे.यामुळे माने यांना गतवेळेसारखी मदत होईल का याबद्दल साशंकता आहे. भाजपकडून राहूल आवाडे यांच्यासाठी उमेदवारीचा आग्रह धरला जात आहे. हा गोंधळ जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत राजकीय अनिश्चितता कायम राहणार आहे.या राजकीय साठमारीच्या गोंधळावर मात केल्यानंतरच खर्या अर्थाने शिवसेनेला आपली ताकद दाखविण्याची संधी मिळणार आहे.
हेही वाचा >>> Loksabha Poll 2024 : ज्येष्ठांवर जबाबदारी, दक्षिणेवर भर- काँग्रेसच्या पहिल्या यादीचे संकेत
इस्लामपूर, वाळवा हे दोन्ही विधानसभा मतदार संघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटाकडे प्रतिनिधीत्व आहे. त्यात या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हे आपले पुत्र आणि राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. दुसर्या बाजूला स्वाभिमानीचे राजू शेट्टी गतवेळचा पराभव धुउन काढण्यासाठी कोणत्याही पक्षाचे बोट न धरता एकला चलोचा नारा देत आखाड्यात उतरले आहेत. जयंत पाटील यांच्या मतदार संघात मुख्यमंत्री शिंदे हे आक्रमक बोलतील, आमदार पाटील यांच्यावर राजकीय टीका होईल असे वाटत असतानाच त्यांनी याला बगल देत स्थानिक पातळीवर कोणतेच भाष्य न करता शासनाचे काम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे कौतुक करण्यातच जादा वेळ दिला.
हेही वाचा >>> तटकरे यांच्या मतदारसंघावर गोगावले पुत्राचा दावा
महा विकास आघाडी सरकारवर टीका करतांना त्याला फारसे महत्व देण्याचे टाळले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यात पहिला राजकीय कार्यक्रम इस्लामपूरात घेउन आमदार पाटील यांच्या गडाला शह देण्याचा प्रयत्न केला, मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी हे टाळले. या गटाचे कार्यकर्ते या कार्यक्रमापासून दूरच राहिले. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष निशीकांत पाटील, जिल्हा बंँकेचे संचालक राहूल महाडिक, माजी राज्यमंत्री सदाभाउ खोत, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांची उपस्थिती असली तरी कार्यक्रमाच्या नियोजनात त्यांना फारसी संधीही देण्यात आल्याचे दिसले नाही. जागा वाटपाची बैठक दिल्लीत असल्याने अत्यंत घाईगडबडीने कार्यक्रम उरकण्यात आला. ज्या लाभार्थींना आग्रहाने आमंत्रित करण्यात आले होते, त्या मुख्य कार्यक्रमासाठी घाउकपणे धनादेश, प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. ३४ मिनीटाच्या या कार्यक्रमात या मुख्य कार्यक्रमासाठी केवळ काही सेकंदाचा वेळ देण्यात आला. कार्यक्रम गुंडाळल्याने हा दौरा प्रभावशाही न होता केवळ शासकीय औपचारिकताच ठरला.