कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शुक्रवारी कोल्हापुरात येत आहेत. याचवेळी जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात भाजपकडून चाचपणी करीत सक्षम उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. दोन्ही पातळ्यांवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडी त्यामुळे उल्लेखनीय ठरल्या आहेत.
लोकसभा निवणुकीत राज्यातील ४५ जागा जिंकण्याचा निर्धार भाजपकडून वारंवार बोलून दाखवला जात आहे. हे करत असताना भाजपला मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेसह सत्तेत नव्याने सामावलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जागावाटपात योग्य वाटा द्यावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना अंतर्गत सर्वेमध्ये फुटीर उमेदवारांबाबत वातावरण अनुकूल नसल्याचा एक निष्कर्ष पुढे आला आहे. ही बाब भाजपकडून गांभीर्याने घेतली गेली आहे. त्यातूनच कोल्हापुरात भाजपकडून लोकसभेसाठी चाचपणी सुरू आहे. जिल्ह्यात दर महिन्याला येणारे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीबाबत वारंवार विचारले असता याचे चित्र लवकरच पाहायला मिळेल असे उत्तर येत आहे. अशातच जिल्ह्यातील एक मतदारसंघ भाजपला मिळावा अशी जाहीरपणे मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा – तटकरे आणि गोगावले सूर जुळणे अशक्यच
या सावध हालचाली बरेच काही सांगणाऱ्या आहेत. त्यासाठी ऐक्याची समझोता एक्सप्रेस पुढे नेण्यावर भर दिला जात आहे. याआधी वडगाव बाजार समितीमध्ये महाडिक परिवार, विनय कोरे प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर आदी आमदार यांनी एकत्रित येऊन सत्ता मिळवली होती. महाडिक यांच्या राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवेळी याच प्रयोगाने सत्ता मिळवून दिली होती. हाच मार्ग लोकसभेसाठी भाजप – मित्रपक्ष यांच्याकडून अधिक व्यापक पातळीवर अनुसरला जात आहे.
कोल्हापुरात फेरपालट
कागल विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार आणि जिंकणार, असा निर्धार भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी मुश्रीफ मंत्री झाल्यानंतर जाहीरपणे व्यक्त केला आहे. मुश्रीफ यांनीही निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. या दोघा मातबरांमध्ये उमेदवारी कोणाला द्यायची हा गंभीर पेच आहे. यातूनच मुश्रीफ यांना कोल्हापुरात लोकसभेसाठी उतरवण्याची चाचपणी केली जात आहे. यापूर्वी मुश्रीफ यांनी आपल्याला लोकसभा निवडणूक जिंकून खासदार व्हायचे आहे असा संकल्प बोलून दाखवला होता. ती संधी त्यांना यानिमित्ताने मिळू शकते. अजितदादा गटाचा लोकसभेसाठी जागावाटपाचा मुद्दा मार्गी लागू शकतो. खासदार संजय मंडलिक यांना विधानपरिषदेवर घेण्याचे घाटत आहे. यातून कागलचा वादही मिटू शकतो.
हेही वाचा – जुन्याजाणत्यांना बरोबर घेऊन मराठवाड्यात शरद पवार पक्ष पुनर्बांधणी करणार
हातकणंगलेत पर्यायांचा शोध
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील एक जागा लोकसभेची एक जागा भाजपला द्यावी अशी मागणी केली आहे. त्यासरशी हाळवणकर हेच भाजपचे उमेदवार असतील या चर्चेला वेग आला आहे. खासदार धैर्यशील माने हे वरिष्ठांच्या वर्तुळात वावरतात. दुसऱ्या पातळीतील कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत. अशा भावना भाजपकडून व्यक्त झाल्या आहेत. नाराजीचा हा कल लक्षात घेऊन येथे सक्षम उमेदवारीचा पर्याय शोधण्याच्या हालचाली सुरू आहेत. यातूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आपल्याकडे वळवण्याच्या हालचाली सुरू आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी शेट्टी यांची आवर्जून भेट घेतली होती. यासारख्या काही घटना पाहता शेट्टी यांना भाजपकडे वळवणे किंवा त्यांना अपक्ष म्हणून पाठिंबा देणे असे दोन्ही पर्याय आजमावले जात आहेत. महाविकास आघाडीकडूनही शेट्टी बाबतीत असेच जाळे फेकले जात आहे. शेट्टी यांनी आपले पत्ते खुले केलेले नाही. मात्र निवडणुकीच्या वेळी ते कुठेतरी वळण्याची चिन्हे आहेत.
शिंदे गट मैदानात
कोल्हापुरातील भाजपच्या निवडणुकीच्या हालचालीची कुजबुज सुरू आहे. ही बाब लक्षात घेऊन महिना पूर्ण होण्याआधी मुख्यमंत्री शिंदे तातडीने पुन्हा कोल्हापुरात धाव घेत आहेत. कोल्हापूरच्या दृष्टीने महत्त्वाचा कोणताही विषय नसताना शिंदे यांचा दौरा चर्चेत आहे. निवडणुकीच्या तयारीकडे लक्ष देऊन शिंदे येत असले तरी त्याला अंतर्गत शह प्रतिशह राजकारणाची पार्श्वभूमी आहे. वरकरणी भाजप-शिंदे शिवसेना यांच्यात सख्य असल्याचे दाखवले जात असले तरी अंतर्गत स्पर्धा लपून राहिलेली नाही. कोल्हापुरात ती अधिक प्रवाहित होताना दिसत आहे.