शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाण्यातले बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी गंभीर आरोप करत या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी केली आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. ही असली मागणी हा अत्यंत केविलवाणा प्रकार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी?
“सुरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी होते आहे ही मागणी उद्धव ठाकरे गटाने केली आहे. हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. सगळ्या चौकशांना आम्ही सामोरं जाऊ शकतो. आमचं पारदर्शक सरकार आहे. ठाकरे गटाला फक्त आरोप करत राजकारण करायचं आहे. एक आरोप केला होता त्यात तोंडघशी पडले. कोर्टाने त्यांना जागा दाखवली आहे.” असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काय म्हटलं होतं?
ठाण्यातील एक बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर जी डायरी सापडली त्या डायरीत सांकेतिक नावं आहेत. ती नावं कोणाची आहेत ती आम्हाला माहिती आहेत,” असं सूचक वक्तव्य करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. ते रविवारी (२५ डिसेंबर) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “आमचे खासदार अरविंद सावंत यांनी एक विषय मांडला. ठाण्यातील एक बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर जी डायरी सापडली त्या डायरीत सांकेतिक नावं आहेत. ती नावं कोणाची आहेत ती आम्हाला माहिती आहेत. लावा त्यांच्याविरोधात एसआयटी चौकशी. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे आणि भाजपा त्यांना पाठीशी घालत आहे. लावा चौकशी, करा एसआयटी.”
“सुरज परमार यांच्या डायरीवर एसआयटी स्थापन करा”
“राज्यपालांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अपमानाच्या वक्तव्यांची एक मालिकाच चालवली आहे. असं होऊनही भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदावर बसून आहेत आणि भाजपा त्यांचं भजन गात आहे. हा काय प्रकार आहे? एसआयटी यावरच स्थापन झाली पाहिजे. एसआयटी सुरज परमार यांच्या डायरीवर स्थापन झाली पाहिजे.मात्र, ते तसं करत नाहीत. ते विरोधीपक्षांवर एसआयटी लावत आहेत. इतकं सुडबुद्धीने वागणारं सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच आलं नव्हतं,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
ठाण्यातलं सुरज परमार आत्महत्या प्रकरण आहे काय?
ठाण्यातले बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांनी २०१५ मध्ये आत्महत्या केली. ठाण्यात झालेल्या या घटनेनंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. कारण त्यांची सोळा पानी सुसाईड नोट पोलिसांना आढळली होती. तसंच सुरज परमार यांच्या डायरीत काही सांकेतिक नावं असल्याचंही समोर आलं होतं. आपल्याला त्रास देणाऱ्या सहा राजकीय व्यक्तींची नावं परमार यांनी चिठ्ठीत लिहिली होती.. आणि ही नावं त्यांनी खोडली होती. ही नावं वाचली गेली तर आपल्या कुटुंबाला त्रास दिला जाईल असं त्यांनी म्हटलं होतं. सुरज परमार यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत त्यांचं आयुष्य संपवलं. चार नगरसेवकांची नावं त्यांच्या सुसाईड नोटमध्ये असल्याचं समोर आलं होतं. आता या सात वर्षांपूर्वीच्या प्रकरणावरून संजय राऊत यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. तर त्यांची ही मागणी केविलवाणी आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.