Assam : काही दिवसांपूर्वीच आसामच्या गुवाहाटीमध्ये मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच येथील जनजीवनही विस्कळीत झाले होते. त्यानंतर आसाम सरकार पूर परिस्थिती हातळण्यात अपयशी ठरल्याची टीका आसाम सरकारवर करण्यात येत होती. दरम्यान, ही टीका होत असतानाच आता आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एका खासगी विद्यापाठीला लक्ष्य केलं आहे. हे विद्यापीठ हे एका बंगाली मुस्लीम व्यक्तीचं असून या विद्यापीठामुळेच गुवाहाटीत पूर आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच या विद्यापीठाने पूर जिहाद सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळातही विविध चर्चांना उधाण आलं आहे.
उच्च न्यायालयानेही सरकारला फटकारलं
महत्त्वाचे म्हणजे गुवाहाटीमध्ये पूर आल्याच्या दोन दिवसांनंतरच आसामच्या उच्च न्यायालयाने गुवाहाटीतल्या पूर परिस्थितीसंदर्भात दाखल एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना आसाम सरकारलं चांगलेच फटकारलं होतं. “गुवाहाटी शहरातील परिस्थिती अत्यंत वाईट असून शहरातील नागरिकांना पूराचा सामना करावा लागतो आहे, सरकारच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असं न्यायालयाने म्हटलं होतं. तसेच यावर कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी सरकारने पावलं उचलण्याची गरज आहे”, अशी टीप्पणीही न्यायालयाने केली होती.
हेही वाचा – RSS शी संबंधित ‘पांचजन्य’मधून जातीव्यवस्थेचं समर्थन; थेट अग्रलेखातून मांडली सविस्तर भूमिका!
आसामच्या मंत्र्याने मेघालयला धरले होते जबाबदार
याशिवाय आसामच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्र्यांनी गुवाहाटीतील पूर परिस्थितीला मेघालय जबाबदार असल्याचा दावा केला होता. “गुवाहाटीत वाहून येणारे निम्म्याहून अधिक पाणी मेघालयातून आले होते. त्यात शहरात दीड तासात १३६ मिमी पाऊस पडला. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली”, असे ते म्हणाले होते.
दरम्यान, अशा सगळ्या परिस्थितीत आता आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी पूर जिहादचा आरोप केला. सरमा यांनी गुवाहाटीतील पुराला आसामच्या शेजारी असलेल्या मेघालयातील एक खासगी विद्यापीठ जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच या विद्यापाठीने आसाम विरोधात पूर जिहाद सुरू केला असल्याचा आरोप त्यांनी केला.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री सरमा?
“मेघालयातील यूएसटीएम विद्यापीठ एका बंगाली मुस्लीम व्यक्तीचे असून त्यांनी आसाम विरोधात पूर जिहाद सुरू केला आहे. आपण यापूर्वी खतं जिहाद आणि जमीन जिहादबाबत बोललो. पण आता पूर जिहाददेखील सुरु करण्यात आला आहे. अन्यथा या विद्यापाठीने अत्यंत क्रूरपणे त्यांच्या परिसरातील झाडे कापली नसती, ही झाडे कापल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून आले. त्यांनी हे सर्व जाणीवपूर्वक केलं आहे. अन्यथा ते वास्तुविशारद नेमून ड्रेनेज सिस्टीम तयार करू शकले असते. मात्र, त्यांनी असे न करता, थेट झाडे कापण्यास सुरु केली”, असं मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले.
“आसामच्या विद्यार्थ्यांनी संबंधित विद्यापाठीत जाऊ नये”
पुढे बोलताना आसामच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी संबंधित विद्यापीठात जाऊन शिकू नये किंवा तेथील विद्यार्थ्यांना शिकवू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. “या विद्यापीठाने सुरू केलेला पूर जिहादला उत्तर म्हणून आसामच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी त्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. कोणत्याही विद्यार्थ्याने तिथे जाऊन शिक्षण घेऊ नये, तसेच आसामधील शिक्षकांनी तिथे जाऊन विद्यार्थ्यांनी शिकवू नये, तरच पूर जिहाद थांबेल”, असे ते म्हणाले.
यापूर्वी खतं आणि जमीन जिहादचा केला होता आरोप
दरम्यान, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी अशाप्रकारे जिहाद होत असल्याचा आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी खतं जिहाद आणि जमीन जिहाद होत असल्याचा आरोप केला आहे. “काही मुस्लीम शेतकरी भाजीपाला पिकवताना अमर्यादपणे खतांचा वापर करत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. हा एकप्रकारे खतं जिहाद आहे”, असे ते म्हणाले होते. तसेच काही मुस्लीम लोक आसाममध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी विकत घेऊन जमीन जिहाद करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. “मुस्लिमांना जमीन विकू नये. ते जमीन जिहाद करत आहेत”, असे ते म्हणाले होते.