Telangana Congress Politics : तेलंगणामधील काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या १० आमदारांनी एक गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाच्या चिंता वाढल्याचं बोललं जात होतं. यातच तेलंगणा सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी या आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानंतर काँग्रेसच्या १० आमदारांच्या गुप्त बैठकीच्या राजकारणामुळे आणि पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरु आहेत.

पण तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी खरंच मंत्रिमंडळ विस्तार करणार का? याकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याबाबत अनुकूल आहेत का? याबाबतही अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच मंत्रिमंडळात फेरबदल केवळ आवश्यकच नाही तर गरजेचं असल्याचं मत काँग्रेस आमदारांच्या एका गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.

मंत्रिमंडळात किती पदे रिक्त आणि कोण शर्यतीत?

सध्या ११ सदस्यीय मंत्रिमंडळात ६ पदे रिक्त आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार कोमातिरेड्डी राजगोपाल रेड्डी आणि जी विवेक यांसारखे नेते ज्यांनी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा सोडलं होतं. ते या शर्यतीत आहेत. माजी मंत्री शब्बीर अली आणि आमदार कोदंडराम हेही या शर्यतीत असल्याचे सूत्रांनी सांगितलं. मंत्रिमंडळात समावेश होण्यासाठी शर्यतीत असलेल्या नेत्यांच्या बाजूने असं दिसतं की ते अनुभवी नेते आहेत आणि त्यांचा स्वतःचा जनाधार आहे.

तसेच मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे शब्बीर अली आणि कोडंडराम यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याच्या बाजूने असल्याचं सांगण्यात येत आहे. या बरोबरच मागासवर्गीयांचे आणखी काही नेते मंत्रिमंडळात सामील होण्याची शक्यता आहे. जरी मुख्यमंत्री याबाबत मौन बाळगून असले तरी मागासवर्गीय समाजातील नेत्यांना उपमुख्यमंत्री करण्यात यावे, अशी मागणी असल्याचं काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितलं.

मंत्रिमंडळाची सध्याची रचना कशी आहे?

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याकडे महापालिका प्रशासन आणि नागरी विकास, सामान्य प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था आणि इतर सर्व न वाटलेल्या विभागांची खाती आहेत. उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्का वित्त आणि नियोजन आणि ऊर्जा हाताळतात. एन उत्तम कुमार रेड्डी सिंचन, अन्न आणि नागरी पुरवठा हाताळतात तर दामोदर राजनरसिंह हे आरोग्य, वैद्यकीय आणि कुटुंब कल्याण आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत. कोमातीरेड्डी वेंकट रेड्डी (रस्ते), डी श्रीधर बाबू (माहिती तंत्रज्ञान,आणि दळणवळण, उद्योग आणि वाणिज्य आणि विधान व्यवहार), पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी (महसूल आणि गृहनिर्माण, माहिती आणि जनसंपर्क), पोन्नम प्रभाकर (परिवहन और बीसी कल्याण), कोंडा सुरेखा (पर्यावरण आणि वन), डी अनसूया (पंचायत राज आणि ग्रामीण विकास, तुम्माला नागेश्वर राव (कृषी, विपणन, सहकार), आणि जुपल्ली कृष्ण राव (प्रतिबंध आणि उत्पादन शुल्क,पर्यटन आणि संस्कृती आणि पुरातत्व)

मंत्रिमंडळ विस्ताराची गरज आहे का?

विशेषत: श्रीनिवास रेड्डी सारख्या मंत्र्यांच्या विरोधात पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर येण्याची चिन्हे दिसत असताना या महिन्याच्या सुरुवातीला काँग्रेसच्या १० आमदारांनी गुप्त बैठक घेतली. नयनी राजेंद्र रेड्डी, अनिरुद्ध रेड्डी, लक्ष्मी कांता राव, डी माधव रेड्डी, बी इलैया, भूपती रेड्डी, वाय श्रीनिवास रेड्डी, मुरली नाईक, के राजेश रेड्डी आणि संजीव रेड्डी या बैठकीत सहभागी झाले आमदार आहेत.

काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, या बैठकीला अंतर्गत बंडाळीचे लक्षण मानलं जात आहे. मात्र, केंद्रीय नेतृत्वाने हस्तक्षेप करून मतभेद मिटवले आहेत. खुद्द रेवंत रेड्डी यांनी आमदारांना हायकमांडच्या परवानगी शिवाय वैयक्तिक बैठका घेऊ नका, अशा सूचना केल्या आहेत. नाराज असलेल्या काहींना शांत करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असं काँग्रेसमधील काही सूत्रांनी सांगितलं आहे.

दरम्यान, तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख बी मुकेश कुमार गौड यांच्यासोबत १५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीवरून मंत्रिमंडळाच्या विस्तराबाबत चर्चा सुरु झाली. या दोघांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतली. यावेळी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतची माहिती त्यांनी हायकमांडला दिली असल्याचं सांगितलं जातं. तसेच राहुल गांधी यांनी देखील मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी संमती दिल्याचे मानले जात असल्याचं एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने सांगितलं आहे.

Story img Loader