मुंबई : वरळीतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब आणि बार तसेच उपाहारगृहांवर कठोर कारवाई करावी, तसेच मद्याप्राशन करून वाहने चालविणाऱ्याचा वाहन परवाना रद्द करावा. अशी प्रकरणे रोखण्यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यांसह नाक्या-नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आणि महापालिका प्रशासनाला दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वरळी अपघात प्रकरणात शिवसेना उपनेते राजेश शहा यांचा मुलगा असल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच आरोपीवर कारवाईबाबतही संशय व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर मद्यासेवन करून वाहने चालविणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

लोकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन होण्याच्या अनुषंगाने अशा प्रकरणी सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी कडक कारवाई करावी, अशी सूचना शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा >>> शासकीय योजनांच्या प्रचारासाठी ५० हजार योजनादूत ; मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेसाठी ५५०० कोटी

सूचना काय?

● रात्रीच्या वेळेस गाड्या तपासण्यांचे प्रमाण वाढवावे.

● मद्यासेवन करून वाहने चालविणाऱ्या चालकांवर कडक कारवाई आणि दंडाची वसुली करण्यात यावी.

● नियमाचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा परवाना रद्द करण्यात यावा.

● मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरातील पब, बार आणि रेस्टॉरंट्सची नियमित तपासणी करावी.

● पब, बार, उपाहारगृहे चालू ठेवण्याची वेळ, ध्वनिप्रदुषणाचे नियम, आवश्यक परवाने यासंदर्भात वेळोवेळी तपासण्या करण्यात याव्यात.

● रात्री उशिरा सुरू राहणारे बार, पब, उपाहारगृहांवर कारवाई करावी. पालिका व पोलिसांनी त्यांचे परवाने रद्द करावे.

● मद्यासेवन करून वाहने चालविण्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात यावी.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm shinde order to take strict action against pubs and bars for violating rules in mumbai print politics news zws
Show comments