पंढरपूर : वारकरी संप्रदायातील महत्त्वाची मानली जाणारी कार्तिकी एकादशी १२ नोव्हेंबर रोजी आहे. या एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होत असते. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे महापूजा कोणाच्या हस्ते करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे अभिप्राय मागवला असून, त्यांच्या आदेशानुसार नियोजन करण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
हेही वाचा >>> भाजपविरोधात बंडखोरांना शिंदेंकडून आर्थिक रसद; शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आरोप
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. आचारसंहिता लागू झाल्याने अनेक निर्बंध आले आहेत. याचा आचारसंहितेचा फटका कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेला बसला आहे. आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, तर कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा अलिखित नियम आहे. मात्र निवडणुकीमुळे कोणाला महापूजेला बोलवायचा हा प्रश्न उपस्थित झाला. याबाबत विधी व न्याय विभागाकडे अभिप्राय मागितला असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली. या आधी अशी परिस्थिती आल्यावर निवडणूक आयोगाच्या परवानगीने महापूजा करण्याची परवानगी दिली होती. कोणतेही राजकीय भाष्य, मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही वक्तव्य असे काही नियम व अट घालून परवानगी दिली होती.
त्यामुळे आता राज्यातील दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोण महापूजेला येणार आणि निवडणूक आयोगाची परवानगी घेणार हे पाहावे लागणार आहे. तसेच जर कोणी परवानगी घेतली नाही, तर शासकीय अधिकारी यांच्या हस्ते महापूजा होईल. वास्तविक महापूजा आणि त्यानंतर सत्कार समारंभ यात जवळपास दोन ते अडीच तास वेळ जातो. या काळात दर्शन रांग थांबविली जाते. मात्र, यंदा आचारसंहिता असल्याने महापूजा होईल आणि लगेच दर्शन सुरू होईल असे नियोजन आहे. मात्र, सर्वसामान्यांचा, कष्टकरी, शेतकरी यांचा देव मानल्या जाणाऱ्या सावळ्या विठुरायाच्या पूजेचा मान कोणाला मिळणार, हे पाहावे लागेल.