मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका घेत त्यासाठी पुढाकार घेऊनही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयत्नांना महाविकास आघाडीकडून विशेषतः काँग्रेसकडून थंड प्रतिसाद मिळत आहे.
काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा आणि त्यानंतर लगेचच होणाऱ्या विधानसभा निवडुकीत भाजपचा पराभव करायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले पाहिजे, अशी काँग्रेसमधील काही नेत्यांची इच्छा आहे, परंतु त्यासाठी अधिकृतपणे कसलाही पुढाकार घेतला जात नाही, त्यामुळे काँग्रेसला नेमके काय करायचे आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये कुरघोड्याच अधिक !
सहा महिन्यांपूर्वीपासून प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीयस्तरावरील इंडिया आघाडीत व महाराष्ट्रात महाविकास आघाडीत सभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्याही आधी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेबरोबर वंचित आघाडीची युतीही जाहीर करण्यात आली. त्यातून महाविकास आघाडीकडे जाण्याची दिशा प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली. मात्र महाविकास आघाडीकडून त्यांच्या प्रयत्नाला म्हणावा तसा प्रतिसाद दिला जात नाही, असे दिसते.
महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय ताकदीचे प्रदर्शन आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबरच्या शिवाजी पार्कवरील विराट सभेच्या माध्यमातून केले. त्या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काही काँग्रेस नेतेही सभेला हजर होते. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणीची नुकतीच बैठक झाली. त्यावेळीही प्रकाश आंबेडकर यांनी विरोधकांच्या एकजुटीची भूमिक विशद करताना, जागावाटपाची लवकर चर्चा सुरू होत नसेल तर, युतीबाबत काय करायचे याचा निर्णय शिवसेनेनेही घ्यावा अन्यथा महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४८ जागा स्वबळावर लढविण्याचा वंचित बहुजन आघाडीला मार्ग मोकळा आहे, असा एक प्रकारे निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतरही महाविकास आघाडीत सामसून असल्याचे दिसते.
हेही वाचा – पुण्यात ब्राह्मण की ब्राह्मणेतर उमेदवार यावरून भाजपपुढे पेच
महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्याची मुख्य जबाबदारी काँग्रेसची आहे. प्रकाश आंबेडकर यांनी त्यादृष्टीने पुढाकार घेतला. सप्टेंबरमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठविले. संविधान सन्मान महासभेला उपस्थित राहण्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निमंत्रण दिले, त्याची ही उदाहरणे असल्याचे सांगितले जाते. परंतु काँग्रेसच्या नेमके मनात काय आहे, हे अजून उघड झालेले नाही.
या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले की, भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी एकत्र आले पाहिजे ही प्रकाश आंबेडकर यांची भूमिका आहे, त्यांनी ती तशी जाहीरपणे मांडली आहे, त्याला कसा प्रतिसाद द्यायचा हा काँग्रेसचा प्रश्न आहे. वंचित आघाडीची भूमिका स्पष्ट केलेली आहे, आता काँग्रेसच्या कोर्टात चेंडू आहे, खरोखरच काँग्रेसला भाजपचा पराभव करायचा आहे की नाही याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे.