पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणावरून पुण्यातील वातावरण तापले असताना शिस्तप्रिय पक्ष म्हणून गणल्या जाणाऱ्या पुणे शहरातील भाजपमध्ये आंदोलनावरून ‘भडका’ उडाला आहे. त्यास भाजपच्या महिला आघाडीने डॉ. सुश्रृत घैसास यांच्या कुटुंबाच्या रुग्णालयाची केलेली तोडफोड कारणीभूत ठरली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आंदोलकांची बाजू घेतल्याने खासदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या. त्यामुळे कोथरुडमधील या तीन दिग्गज नेत्यांमधील शीतयुद्ध चव्हाट्यावर आले आहे.
भाजपमध्ये कोणताही पदाधिकारी हा कधीही पक्षातील वाद जाहीरपणे व्यक्त करत नसतो. मात्र, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर डॉ. सुश्रृत घैसास यांच्या कुटुंबाच्या कोथरुडमधील एरंडवणे येथील रुग्णालयाची भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या आंदोलनानंतर खासदार मेधा कुलकर्णी या उद्विग्न झाल्या. त्यांनी याबाबत शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहून जाहीरपणे नाराजी दर्शविली. घाटे यांनीही त्यांना प्रत्युतर दिले. त्यानंतर भाजपने तातडीने बैठक घेतली. या बैठकीत आंदोलनावर ‘चिंतन’ झाले. चंद्रकांत पाटील यांनी ‘कोणतीही गंभीर घटना घडल्यानंतर त्यावर आंदोलन करणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे’ असे सांगत आंदोलकांच्या बाजूने मतप्रदर्शन केले. मुरलीधर मोहोळ यांनीही आंदोलकांचे समर्थन केले. त्यानंतर खासदार मेधा कुलकर्णी या बैठकीतून निघून गेल्या. पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने निघून गेल्याचे स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आले.
मात्र, या प्रकाराने कोथरुडमधील या तीन प्रमुख नेत्यांमधील ‘कोल्डवॉर’चा भडका उडाला आहे. मेधा कुलकर्णी, चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ या भाजपच्या तिन्ही नेत्यांची कर्मभूमी ही कोथरुड आहे. कुलकर्णी आणि पाटील यांच्यातील शीतयुद्धाला २०१९ च्या विधानसभेपासून सुरुवात झाली. तत्पूर्वी २००९ मध्ये झालेल्या मतदार पुनर्रचनेत कोथरूड विधानसभा मतदारसंघ नव्याने तयार झाला. तोपर्यंत हा परिसर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये होता. भाजप- शिवसेना युती असताना हा मतदारसंघ कायम शिवसेनेकडे राहिला.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एक लाखांहून अधिक मते घेऊन कुलकर्णी या निवडून आल्या. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात राहिला आहे. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. पक्षाचा हा निर्णय कुलकर्णी यांच्यादृष्टीने धक्कादायक होता. कुलकर्णी या आमदार होण्यापूर्वी २००२ पासून सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांच्याऐवजी पुण्याबाहेरील पाटील यांना पक्षाने संधी दिल्याने त्यांनी नाराजीही दर्शविली होती. मात्र, पक्षशिस्तीचा प्रभाव त्यांच्यावर असल्याने त्यांनी जाहीर वाच्यता केली नाही.
मेधा कुलकर्णी आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील शीतयुद्ध हे कोथरुडमध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांना कुलकर्णी यांनी उघडपणे विरोध केल्याने वेळोवेळी दिसून आले आहे. बालभारती-पौडरस्ता रस्त्याला कुलकर्णी त्यांनी विरोध केला. त्यांनी पर्यावरणप्रेमींची बाजू घेतली. कोथरुडमधील तात्यासाहेब थोरात उद्यानात मोनोरेल प्रकल्प राबविला जाणार होता. या प्रकल्पासाठी मोहोळ हे आग्रही होते. मात्र, खासदार कुलकर्णी यांनी या प्रकल्पाला विरोध केल्यास त्यांच्यात वादाची ठिणगी पडली.
पाटील आणि मोहोळ यांच्या ताब्यात कोथरुड गेल्यानंतर अस्वस्थ असलेल्या खासदार कुलकर्णी यांची २०२२ मध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानंतर लोकसभा निवडणुकांपूर्वीच त्यांची राज्यसभेच्या खासदार पदी वर्णी लागली.
खासदार कुलकर्णी यांचे राजकीय कार्यक्षेत्र हे कोथरुड आहे. २००२ मध्ये त्या पहिल्यांदा नगरसेविका झाल्या. त्यानंतर सलग तीनवेळा त्या निवडून आल्या. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि घैसास रुग्णालये ही त्यांच्या प्रभागाजवळील आहेत. त्यामुळे भाजपच्या महिला आघाडीने घैसास रुग्णालयाची तोडफोड करणे, हे त्यांना पटले नाही. त्यामुळे त्यांनी जाहीरपणे असंतोष व्यक्त केला. त्यावरून शहराध्यक्ष आणि त्यांच्यात शाब्दिक युद्ध झाले. त्यानंतरच्या बैठकीत पाटील आणि मोहोळ यांनी त्यांना या विषयावरून एकाकी पाडले. त्यावरून शीतयुद्धाचा भडका उडाल्याने शिस्तीच्या भाजपला बेशिस्तीचे वळण लागल्याचे स्पष्ट झाले आहे.