छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या मंत्रिमंडळात समाविष्ट असलेले पंकजा व धनंजय मुंडे या चुलत भावंडांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांच्या कौटुंबिक नात्यातील आणि पक्षीय पातळीवरील वैचारिक मतभेद मिटवून मनोमीलन झाल्याचे संकेत अनेकवेळा दिलेले असले तरी अजूनही परस्परांविषयी अढीच आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथील कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी केलेल्या काही विधानांवरून भावंडांमधील राजकीय दरी पूर्णपणे मिटली नसल्याचेही अर्थ काढले जात आहेत. महासांगवी येथील धार्मिक कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी, राजकारणात काम करणाऱ्यांनी धर्मात हस्तक्षेप करू नये, असे विधान केले होते. एका भेटीतून एखादा गड आणि तेथील लाेकं आपली होत असतील, असे कोणाला वाटत असेलही पण आपल्याला तसे वाटत नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

पंकजा मुंडे यांच्या त्या विधानाशी धनंजय मुंडे यांनी भगवान गडाला नुकत्याच दिलेल्या भेटीचा संदर्भ जोडला जात आहे. यासोबतच पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांवर काही लोकांनी आरोप केले तेव्हा त्यांनी आपली तत्त्वं व स्वत्त्व जपण्यासाठी स्वत:ला मोठी शिक्षा करून घेतली होती, असाही एक संदर्भ दिला आहे. त्यांच्या वरील विधानांमागचा रोख सध्या रोज नवनव्या आरोपांवरून वादग्रस्त ठरलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या दिशेने आहे का ? असे प्रश्न उपस्थित करणारा आहे.

दोन महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यात घडलेले संतोष देशमुख हत्या प्रकरण, पाठोपाठ लगेच धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांच्यावर दोन कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कराडवर ‘मकोका’ही लावण्यात आला. यानंतर कराडच्या संपत्तीचेही बिंग फुटले. त्याची कोट्यवधींची संपत्तीही डोळे विस्फारणारी ठरली. कराडने धनंजय मुंडे यांच्या पाठबळानेच माया जमवली असल्याची चर्चा सुरू असतानाच मुंडे यांच्यावरही कृषिमंत्री असतानाच्या कार्यकाळात काही वस्तु खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा नवा आरोप झाला. पीकविम्यातील घोटाळ्याचा प्रश्न संसदेतही उपस्थित करण्यात आला. त्यावर देशाच्या कृषिमंत्र्यांनी चौकशीचे आश्वासन दिले. त्यानंतर करुणा शर्मा-मुंडे यांच्याकडून वांद्रे न्यायालयात दाखल एका प्रकरणातही धनंजय मुंडे यांनी कौटुंबीक हिंसाचार केल्याचा आरोप अंशत: मान्य करण्यात आला आहे. यावरूनही धनंजय मुंडेंची प्रतिमा अधिक डागाळली गेली. परिणामी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून अधिकच जोरदारपणे लावून धरण्यात आली होती.

या सर्व पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांवर झालेल्या आरोपांनंतर त्यांनी सत्त्व व तत्त्व पाळल्याकडे लक्ष वेधण्यामागचे काही अर्थही लावले जात आहे. धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध बंड पुकारले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या हयातीतच धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांचे नेतृत्त्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१९ मध्ये पंकजा मुंडे यांचाही ३२ हजारांच्या फरकाने पराभव केला होता. या घटनांमधून निर्माण झालेली कौटुंबीक व राजकीय स्तरावरील अढी अद्यापही पंकजा मुंडेंच्या मनामध्ये अजूनही खदखदत असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू आहे.

Story img Loader