जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील विविध घोटाळे व नोकर भरतीवरून पालकमंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर या काँग्रेसच्या दोन नेत्यांमधील मतभेद समोर आले आहेत. आमच्यात मतभेद नाहीत, असे दोन्ही नेते माध्यमांशी बोलताना सांगत असले तरी चंद्रपूर जिल्हा बँकेतील ३६० पदांच्या नोकर भरतीला सहकार खात्याची स्थगिती मिळविण्यात खासदार धानोरकर यांना यश आल्याने पालकमंत्री विरूध्द खासदार हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.


पालकमंत्री वडेट्टीवार यांचे वर्चस्व असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ सन २०१२ ते २०१७ पर्यंत होता. याकाळात दोन वेळा नोकर भरती करण्यात आली. ही भरती वादग्रस्त ठरली. तसेच यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोपही झाला. या काळात बॅंक अनेक घोटाळ्यांनी गाजली. एका अध्यक्षाला तुरुंगात जावे लागले. ही शेतकऱ्यांची बॅंक आहे. परंतु शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी काही संचालक आपले हितसंबध जोपासत असल्याचा आरोप होतो आहे.  संचालक मंडळाचा कार्यकाळ आधीच संपला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जून २०२१ रोजी दिलेल्या आदेशात कार्यकाळ संपलेल्या बॅंकांवर प्रशासक नियुक्त करुन निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. परंतु चंद्रपूर मध्यवर्ती बॅंकेवर अद्याप प्रशासक नियुक्त झालेला नाही, याकडे खासदार धानोरकरांनी लोकसभेत लक्ष वेधले होते.

याउलट सहकार खात्याने ३६० जणांच्या नोकर भरतीला मान्यता दिली. ही मान्यता म्हणजे गैरव्यवहारांना खतपाणी घालण्याचे काम असल्याचा आरोपही झाला. बॅंकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर यापूर्वीच बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणात दोन फौजदारी खटले दाखल आहेत. अशा व्यक्तीला मुख्य व्यवस्थापकपदी घेऊ नये, असे रिझर्व्ह बॅंक, नाबार्ड, सहकार विभागाचे निर्देश आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष करुन बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाने त्यांना मुदतवाढ दिली. धानोरकर यांनी त्याची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केली. इथूनच खऱ्या अर्थाने वडेट्टीवार व धानोरकर यांच्यातील शीतयुध्दाला  सुरूवात झाले. ही वस्तुस्थिती असली तरी बँकेचे एक संचालक रवींद्र शिंदे यांनी काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या वरोरा-भद्रावती मतदार संघात धानोरकर दाम्पत्याविरोधात कामाला सुरुवात केली. म्हणूनच धानोरकर यांनी जिल्हा बँकेला लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा बँकेतील विविध विषय धानोरकर दाम्पत्यांनी लावून धरल्यानंतर पालकमंत्री वडेट्टीवार यांनी नुकतीच धानोरकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व त्यांच्यात कुठलेही मतभेद नसल्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिला. परंतु लगेच दुसऱ्याच दिवशी सहकार खात्याने नोकर भरतीला स्थगिती दिल्याने या दोन्ही नेत्यांमधील वाद शिगेला पोहचला आहे. चंद्रपूर जिल्हा बँकेच्या विषयावरून काँग्रेस पक्ष दोन गटात विभागला आहे. यात एक गट पालकमंत्री वडेट्टीवार यांचा तर दुसरा गट खासदार धानोरकर यांचा आहे. याचा थेट परिणाम संघटनेवर झाला आहे. ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे वडेट्टीवार गटाचे असल्याने त्यांनी धानोरकर गटाच्या कार्यक्रमापासून अंतर राखल्याची चर्चा आहे. तर काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी खासदार धानोरकर गटाचे असल्याने त्यांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या बैठकांपासून स्वत:ला दूर ठेवले आहे. पालकमंत्री व खासदार यांच्या या शीतयुध्दात पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र संघटनेपासून दूरावत चालला आहे.

Story img Loader