नागपूर : नागपूर विमानतळावरील धावपट्टी(रन-वे ) रिकार्पेटिंगच्या कामाला विलंब होत असल्याने विमान प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन नागपूरचे खासदार म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांची जाहीर माफी मागितली होती. त्यानंतर त्यांच्याच खात्याच्या अखत्यारित येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बांधलेला बुटीबोरी (जि- नागपूर)येथील उड्डाण पुल खचला, त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. यामुळेही प्रवाशांची गैरसोय होत असून अजूनही पुलावरून वाहतूक बंदआहे, त्यामुळे या प्रकरणातही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरकर प्रवाशांची माफी मागणार का ? असा सवाल केला जात आहे.
डिसेंबर २०२४ मधील वरील घटना आहेत. त्याकडे बघण्याचा प्रशासन व लोकप्रतिनिधींचा दृष्टिकोण वेगवेगळा आहे. रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तुलनेत लोकप्रतिनिधींना विमान प्रवाशांची काळजी अधिक आहे, असेच वरील घटनांवरील लोकप्रतिनिधींच्या प्रतिक्रियेवरून दिसून येते.नागपुर विमानतळावर ३२०० मीटर रनवेच्या रिकारपेटिंग चे काम गेल्या अनेक महिन्यांपासून केले जात असून, या कामामुळे विमानांचे उड्डाणे सकाळी १० ते ६ पर्यंत बंद आहे. त्यामूळे विमानाने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा त्रास होत आहे.
विमान कंपन्यांनी त्यांच्या तिकीट दरात वाढ केल्याने त्याचा अतिरिक्त भूर्दंड नागपूरकर विमान प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे एक जागरूक लोकप्रतिनिधी व नागपूरचा खासदार म्हणून गडकरी यांनी २३ डिसेंबर २०२४ ला नागपूर विमानतळाला भेट देऊन रिकार्पेटिंगच्या कामाची प्रत्यक्षात पाहणी केली. आणि विमानतळ प्राधिकरणावर प्रचंड नाराजी व्यक्त करीत कोणत्याही परिस्थितीत रनवेचा रिकारपेटिं चे कामे एक महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश विमानतळ प्रशासनाला दिले. तसेच नागपूरकरांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत त्यांनी जाहीर माफी मागितली. त्यांच्या माफीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली होती. कामाला गतीही मिळाली पण. अद्याप हे काम पूर्ण झाले नाही हे येथे उल्लेखनीय.
दरम्यान यानंतर काहीच दिवसांनी नागपूर-हैदराबाद मार्गावरील बुटीबोरी ( जि- नागपूर) येथील उड्डाण पुलाचा काही भाग खसल्याने त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली तरी यामुळे नागपूरहून चंद्रपूर, वर्धा ,यवतमाळकडे जाणारे व तिकडून नागपूरकडे येणाऱ्यांना बुटीबोरीतील वाहनकोंडीला तोंड द्यावे लागते. विशेष म्हणजे हा पुल गडकरी यांच्या मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बांधलेला आहे. तो काहीच वर्षात अंशता का होईना खचल्याने त्याची जबाबदारी ही गडकरी यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांवरच येते. शिवाय येथे होणाऱ्या वाहनकोंडीचा नागपूरकर प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे गडकरी यांनी ज्या प्रमाणे विमान प्रवाशांच्या गैरसोयीबाबत संवेदनशिलता दाखवून प्रवाशांची माफी मागितली, त्याच धर्तीवर ते त्यांच्याच खात्याने बांधलेला पुल खचल्याबाबत आणि त्यामुळे होणाऱ्या प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल माफी मागणार का ? असा सवाल करीत आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून दखल
विमानतळावरील धावपट्टीचे काम जलदगतीने पूर्ण व्हावे तसेच खचलेल्या पुलावरील वाहतूक पूर्ववत सुरू होऊन प्रवाशांची वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबधित विभागाना आदेश दिले आहेत. एनएचआयच्या अधिकाऱ्यांची एक चमू बुटीबोरीला भेट देऊन गेली आहे.