नगरः गेली अर्धशतक राजकीय संघर्षात रखडलेला निळवंडे प्रकल्प नुकताच पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. धरणाच्या डाव्या-उजव्या कालव्यातून नगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील गावागावांतून पाणी खेळू लागले. दीर्घ प्रतीक्षेनंतर दुष्काळी गावातून पाणी पोहोचल्याचा आनंदोत्सव शेतकरी साजरा करत आहेत. त्याचबरोबर कालव्यातून पाणी पुढे पोहोचू लागले, तसे नेते श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, मधुकर पिचड, भानुदास मुरकुटे, प्राजक्त तनपुरे असे सर्वच नेते या श्रेयवादात उतरले आहेत. विखे- थोरात यांच्यामधील पारंपारिक राजकीय संघर्षाला ‘निळवंडे’ने पुन्हा नव्याने धार चढवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतशिवारात पाणी पोहोचल्याचे स्वागत शेतकरी ढोल-ताशे वाजवत, गुलाल उधळत करत आहेत. त्याचबरोबर नेत्यांचे जलपूजनाचे कार्यक्रमही रंगू लागले आहे. या कार्यक्रमात आपल्यामुळेच कसा प्रकल्प पूर्ण झाला, आपणच कसा पाठपुरावा केला, निधी मिळवला, बैठका घेतल्या याच्या कथा सांगत दावा केला जात आहे. तोंडावर आलेली लोकसभा निवडणूक आणि आगामी विधानसभा निवडणुकीचा वेध घेत श्रेयवादाचे शड्डू ठोकले जात आहेत. परस्परांचा उल्लेख निळवंडे धरणाचे ‘जलनायक’ आणि ‘खलनायक’ असा केला जाऊ लागला आहे.

हेही वाचा – नंदुरबारमधील सिंचन प्रकल्पाच्या सुधारित मान्यतेवरुन श्रेयवाद

अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधत महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात करताना त्यांनी काँग्रेसचे माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना उद्देशून जोरदार वाग्बाण सोडले. थोरात यांनीही त्याला प्रत्युत्तर देताना निळवंडेचे ‘जलनायक’ व ‘खलनायक’ कोण हे जनतेला माहिती आहे, ज्यांनी धरणाला विरोध केला तेच पाणी सोडण्याचे श्रेय घेत आहेत. १९९९ मध्ये आपण पाटबंधारे राज्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यानंतरच या कामाला गती आली. सतत पाठपुरावा करून निधी मिळवला, अनेक अडचणींवर मात करत धरण पूर्ण केल्याचे, नियतीने आपल्या हातून धरण पूर्ण करून घेतल्याचे आपल्याला समाधान आहे, असा दावा केला आहे.

या श्रेयवादात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील पुढे आले. लाभक्षेत्रातील राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचे ते मामा. महाविकास आघाडी सरकारमध्ये जलसंपदा खात्याचे मंत्रिपद त्यांच्याकडे होते. आता पाणी कोणीही सोडत असले तरी आपल्याकडे जलसंपदाचे मंत्रिपद असताना प्रकल्पाचे ८० ते ९० टक्के काम झाले, त्यासाठी आपण व तनपुरे यांनी वारंवार बैठका घेतल्या, निधी उपलब्ध केल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर पिचड यांनीही बाळासाहेब थोरात यांच्यावर टीकास्त्र सोडले. निळवंडे धरणाचे श्रेय घेण्यासाठी सध्या स्पर्धा सुरू असली तरी धरणाची जागा, घळभरणी, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कालवे ही कामे आपण केली. त्याचे श्रेय घेण्याची इच्छा आपली नाही. परंतु कालवे संगमनेरला (थोरात) का नाहीत? अजित पवार यांच्यामुळेच पाईप बंद कालवे मंजूर झाले, शरद पवार यांनी भंडारदरा धरणाच्या पाण्याचे फेरवाटप केल्यानेच संगमनेर, अकोल्याला निळवंडेचे पाणी मिळाले असे ते सांगतात.

हेही वाचा – भाजपाची नवी खेळी! जम्मू-काश्मीरच्या स्थानिक निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळणार, लोकसभेत विधेयक मंजूर

निळवंडे धरणाच्या श्रेयवादाला लाभक्षेत्रातील साखर कारखानदारांच्या ऊस पळवापळवीच्या राजकारणाचीही किनार आहे. त्यातूनच माजी आमदार, अशोक सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा भानुदास मुरकुटे यांनी विखे आणि थोरात या दोघांनाही लक्ष केले आहे.

पाणीवाटपाचा प्रश्न प्रलंबित

निळवंडे धरणाचे काम सुरू झाले तेव्हा ७ कोटी ९३ लाखांचा खर्च अपेक्षित होता. धरण पूर्ण झाले तेव्हा तो ५ हजार १७७ कोटी ७८ लाखांवर पोहोचला. नगर जिल्ह्यातील ६ व नाशिकमधील १ अशा सात तालुक्यांतील १८२ गावांतील ६७ हजार ८७८ हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आले. धरणाची क्षमता ८.३२ टीएमसी आहे. डाव्या कालव्याची लांबी ८५ किमी तर उजव्या कालव्याची लांबी ९२.५० किमी आहे. धरणाच्या लाभक्षेत्रातील पाणीवाटपाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. भविष्यातील वादाची ती नांदी ठरण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Competition among ahmednagar leaders to take credit for the nilwande project print politics news ssb
Show comments