हर्षद कशाळकर
अलिबाग- ठाणे आणि कल्याण पाठोपाठ शिवसेनेच्या रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे, त्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थतेचे वातावरण आहे.
ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा सांगितल्यानंतर आणि रायगड आणि मावळ मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे, त्या दृष्टीने भाजपने मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी सतिश धारप यांची तर मावळ लोकसभा मतदारसंघासाठी प्रशांत ठाकूर यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडमधून शेकापमधून भाजपात आलेल्या धैर्यशील पाटील यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. वास्तविक मावळ मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत. यामुळे ही जागा भाजपला सुटणे कठीण आहे.
हेही वाचा… शिंदे यांच्याकडून फडणवीसांवर कुरघोडी ; भाजपमध्ये अस्वस्थता
भाजपच्या या वाढत्या महत्वाकांक्षामुळे शिवसेनेत मात्र अस्वस्थता पसरली आहे. आधीच ठाणे आणि कल्याण मतदारसंघावर भाजपने दावा सांगीतल्याने, शिवसेना शिंदेगट आणि भाजपमधील संबध ताणले गेले आहेत, अशातच आता रायगड आणि मावळ मतदारसंघासाठी भाजपने तयारी सुरु केल्याने, शिवसेना शिंदेगटाची चिंता चिंता वाढली आहे. जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे तीन, तर भाजपचे तीन आमदार आहेत.
हेही वाचा… भाजपमधील निष्ठावंतांनी विखे पिता-पुत्राविरुद्ध थोपटले दंड!
लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे विद्यमान खासदार आहेत. मतदार संघातून २०१४, २०१९ असे सलग दोन वेळा ते शिवसेनेच्या तिकीटावर या मतदारसंघावर निवडून आले आहे. यापुर्वीही २००९ मध्ये शिवसेनेचे गजानन बाबर मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे मावळ मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. . या मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील ३ तर पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यातील तीन विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर एक शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे भाजपला हा मतदारसंघ हवा आहे.
हेही वाचा… ‘ओबीसी’वरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये कलगीतुरा
तर रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे खासदार आहेत. मतदारसंघातून २००९ आणि २०१४ मध्ये शिवसेनेचे अनंत गीते हे या मतदारसंघातून निवडून गेले होते. मात्र २०१९ ची निवडणूकही अनंत गीते यांनी याच मतदारसंघातून लढविली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी त्यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील चार तर रत्नागिरी जिल्ह्यातील दोन मतदारसंघाचा समावेश आहे. यापैकी तीन शिवसेना शिंदे गट, एक शिवसेना उद्धव ठाकरे गट, एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक भाजपच्या ताब्यात आहे. मतदारसंघातील पक्षीय बलाबल लक्षात घेतले तर या मतदारसंघातून शिवसेनेची ताकद जास्त आहे. म्हणूनच शिवसेनेच्या शिंदे गटाला रायगड लोकसभा मतदारसंघ हवा आहे. पण याही मतदारसंघात भाजपने मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. शेकापचे धैर्यशील पाटील यांना पक्षात घेऊन त्यांचे रायगड लोकसभा मतदारसंघात राजकीय पुनर्वसन कऱण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे.
हेही वाचा… नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार की बदलणार ?
मावळ आणि रायगड हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे आम्ही दोन्ही मतदारसंघावरचा हक्क सोडलेला नाही. दोन्ही जागांसाठी आम्ही आग्रही राहू, अर्थात युतीतील जागा वाटपाचा निर्णय वरिष्ट पातळीवर होईल. एखाद्या जागेसाठी तडजोड केली जाऊ शकते. पण सरकरट सर्व मतदारसंघावर दावा करणे योग्य होणार नाही. – महेंद्र दळवी आमदार, शिवसेना