सुमित पाकलवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात सर्वच पक्षात उमेदवारीवरून अस्वस्थता पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सर्वच पक्षांनी उमेदवार निवडीसाठी आतापासूनच अंतर्गत हालचाली सुरू केल्याने नेते एकमेकांचा पत्ता कट करण्यासाठी कुरघोडी करताना दिसून येत आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील मोठ्या क्षेत्रात मोडणाऱ्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात गडचिरोली जिल्ह्यातील तीन, चंद्रपूर जिल्ह्यातील दोन तर गोंदिया जिल्ह्यातील एक असे सहा विधानसभा क्षेत्र येतात. त्यामुळे निवडणुकीदरम्यान आणि निवडून आल्यानंतर सुध्दा जनसंपर्कासाठी उमेदवाराची चांगलीच दमछाक होत असते. या क्षेत्रातून निवडून येणाऱ्या खासदाराला बऱ्याचदा सहा विधानसभेत प्रत्यक्ष पोहोचणे शक्य होत नाही. परिणामी जनतेमध्ये विरोधी वातावरण तयार होण्यास सुरवात होते. सलग दोनदा निवडून आल्यामुळे यंदा याच स्थितीचा सामना भाजपचे वर्तमान खासदार अशोक नेते यांना करावा लागू शकतो. त्यामुळे यंदा भाजप नवा उमेदवार देण्याची तयारी करीत आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे पक्षांतर्गत काही नेत्यांनी उमेदवारीसाठी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे ‘मेक इन गडचिरोली’ योजनेच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोपामुळे गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्यावर देखील नेतृत्वाची नाराजी आहे. त्यामुळे विधानसभेसाठी सुध्दा भाजप नव्या उमेदवाराला संधी देणार अशी चर्चा आहे. यात डॉ. मिलिंद नरोटे यांचे नाव आघडीवर आहे. काँग्रेसमध्ये सुध्दा उमेदवारीवरून अंतर्गत घुसफुस सुरू असून लोकसभेसाठी नामदेव किरसान यांचा याहीवेळी दावा राहणार आहे. त्यांची तयारी सुरू आहे. सोबत डॉ. नामदेव उसेंडी सुध्दा उमेदवारीच्या प्रयत्नात आहे.

हेही वाचा… कर्नाटक आम्हीच जिंकू! काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जु खरगे यांना विश्वास

विधानसभेसाठी सुध्दा काँग्रेसकडून डॉ. उसेंडी आणि डॉ. चंदा कोडवते हेही पुन्हा उत्सुक आहे. अहेरी विधानसभेत सुध्दा उमेदवारीवरून संभ्रम कायम आहे. मागील वेळेस भाजपचे माजी मंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम पराभव केला होता. यंदा आमदार धर्मरावबाबा आत्राम हे लोकसभा लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम विधानसभेसाठी तयारीला लागल्या आहेत. माजी आमदार दीपक आत्राम यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केल्यामुळे याही विधानसभेत भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरमोरी विधानसभेचे भाजपचे आमदार कृष्णा गजबे यांच्या विरोधात अंतर्गत स्पर्धक नसल्याने तुलनेने राजकीय अस्वस्थता कमी असल्याचे जाणवते. काँग्रेसमध्ये देखील माजी आमदार आनंदराव गेडाम आणि वामनराव सावसागडे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे ऐनवेळेस पक्ष नेतृत्व कोणाला तिकीट देणार याबद्दल सर्वच पक्षात प्रस्थपित आणि इच्छुकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : उद्धव ठाकरेंनी मराठवाड्याबरोबर बेईमानी केली, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

धर्मरावबाबांमुळे उत्सुकता वाढली

अहेरी विधानसभेचे आमदार माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी लोकसभा निवडणूक लढणार अशी घोषणा केली आहे. तशी तयारी देखील सुरू केली आहे. जिल्ह्यात आणि आदिवासी समाजात त्यांचे राजकीय वलय लक्षात घेता लोकसभेत यंदा चुरस पाहायला मिळणार आहे. आता ते नेमके कोणत्या पक्षाकडून उमेदवारी दाखल करणार हा देखील चर्चेचा विषय आहे.