गणेश यादव,लोकसत्ता
पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गणेश दर्शनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील वातावरण ढवळून काढले. मागील आठवडाभर दोन्ही पवारांचीच शहराच्या राजकारणात चर्चा सुरू असताना केंद्रात, राज्यात सत्तेत असलेल्या शहर भाजप आणि मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत मात्र शांतता दिसून येते. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून शहर भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचे दिसून येते.
राज्यात वर्षभरापूर्वी शिंदे गट आणि भाजपची सत्ता आली. सत्ताबदलानंतर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शांतता होती. कोणी विचारत नव्हते, प्रशासन दाद देत नव्हते. शिंदे गटाचे खासदार आणि भाजप आमदारांचेच प्रशासन ऐकत होते. परंतु, जुलै महिन्याच्या सुरुवातीला अजित पवार बंडखोरी करत राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. राष्ट्रवादीत फूट पडली. दोन नगरसेवकांचा अपवाद वगळता सर्व माजी नगरसेवक अजित पवार गटात सहभागी झाले. सत्ता येताच पवार गटात उर्जा निर्माण झाली. पक्षातील फुटीनंतर रोहित पवार यांनीही पहिल्यांदाच शहराच्या राजकारणात लक्ष घातले. नवीन शहराध्यक्ष निवडला. दोन्ही गटात राजकीय संघर्ष सुरु झाला.
हेही वाचा >>> सततच्या ‘ कोंडी’ त पंकजा मुंडे, नाराजीचा परिघ देवेंद्र फडणवीसांपासून अमित शहांपर्यंत
रोहित यांनी शनिवारी मध्यरात्री तीन वाजेपर्यंत सार्वजनिक गणेश मंडळांच्या आरत्या करत ताकद आजमाविली. कुटुंबातील पुतण्याच मैदानात उतरल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील तातडीने रविवारी शहरात दाखल झाले. दिवसभर त्यांनी मंडळांच्या आरत्या केल्या. उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी पहिल्यांदाच गणेश मंडळांच्या भेटीसाठी संपूर्ण दिवस दिला. रोहितमुळेच अजित पवार यांनाही शहरासाठी जास्त वेळ द्यावा लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
एकीकडे पवार काका-पुतण्यांनी गणेश मंडळांच्या भेटींनी शहरातील राजकीय वातावरण ढवळून काढले असताना दुसरीकडे भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत मात्र कमालीची शांतता दिसून येत आहे. राष्ट्रवादीनंतर पिंपरी-चिंचवड शहर हा भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता होती. दोन विधानसभेवर आणि विधानपरिषदेवर एक असे तीन आमदार शहरात भाजपचे आहेत. अजितदादा सत्तेत आल्याने शहर भाजपमधील नाराजी लपून राहिली नाही. महापालिका प्रशासनही आता त्यांचे ऐकू लागले.
हेही वाचा >>> कल्याणचा तिढा सुटला, ठाण्याचा संभ्रम कायम
गैरव्यहार झालेल्या कामांचे लेखापरीक्षण करण्याच्या घोषणेने अगोदरच नाराजी असलेल्या भाजपमध्ये शहर कार्यकारिणीवरुन त्यात भर पडली. त्यामुळे भाजपध्ये शांतता दिसून येत आहे. भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वतीने आयोजित ‘श्री अष्टविनायक शिव महापुराण कथा वाचन” सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली खरी पण, शहरातील गणेश मंडळांना भेटी दिल्याचे दिसून आले नाही. शिवसेना शिंदे गटातही शांतता दिसून येत आहे. शिंदे गटाचा एकही मोठा नेता गणेशोत्सवात शहरात फिरलेला नाही एकंदरीतच पवार काका-पुतण्यांनी गणेश मंडळांना भेटी देवून राजकारण ढवळून काढले असताना दुसरीकडे भाजप- शिवसेनेत मात्र शांतता दिसून आली.