ठाणे : भिवंडी लोकसभेच्या जागेसाठी महायुतीतर्फे भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी, महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याची चर्चा असून येथून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) आणि जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. या दोघांमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू असून यापैकी कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार की अन्य कुणी तिसरा उमेदवार असणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
भिवंडी लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येतात. यामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, शहापूर, मुरबाड या मतदार संघाचा समावेश आहे. हा मतदार संघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. या मतदार संघातून २००९ मध्ये काँग्रेसचे सुरेश टावरे हे निवडून आले होते. त्यांनी भाजप उमेदवार जगन्नाथ पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीमध्ये मोदी लाटेत काँग्रेसचा पराभव होऊन भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे निवडून आले. कपिल पाटिल हे २०१४ मध्ये एक लाख तर, २०१९ मध्ये दिड लाख मताधिक्याने विजयी झाले. त्यावेळी शिवसेना भाजपसोबत होती आणि अखंड होती, आता शिवसेना फूट पडली असून त्यातील ठाकरे गट भाजपसोबत नाही. यामुळे यंदा राजकीय गणिते बदलल्याने ही जागा जिंकण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी कंबर कसली आहे.
हेही वाचा >>>राहुल गांधी यांच्या यात्रेच्या वातावरणनिर्मितीचा मुंबईत काँग्रेसला फायदा किती ?
आगरी, कुणबी, आदिवासी अशा मतदारांचा भारणा असलेल्या भिवंडी लोकसभा मतदार संघात २००९ मध्ये काँग्रेसचा खासदार निवडून आला होता तर, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून त्यांनी शरद पवार यांच्यामार्फत उमेदवारीसाठी मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चा आहे. याशिवाय, जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून त्यासाठी त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या मार्गावर राहुल गांधी यांच्या स्वागताचे फलक लावून वातावरण निर्मिती केली होती.
हेही वाचा >>>आगामी लोकसभा निवडणुकीत ‘या’ १० राज्यांवर सगळ्यांचे लक्ष, कोण मारणार बाजी?
निलेश सांबरे कोण आहेत
शिक्षण , आरोग्य , रोजगार , महिला सक्षमीकरण या माध्यमांतून सर्वसामान्य घटकांनाही चांगले जीवनमान मिळावे, समाजातल्या शेवटच्या घटकांचा विकास व्हावा या हेतूने निलेश सांबरे यांनी २००८ साली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेची स्थापना केली. संघटनेच्या माध्यमातून त्यांनी भिवंडी, वाडा , पालघर , कल्याण आणि ठाणे या ठिकाणी नुकतेच निर्धार मेळावे घेऊन भिवंडी लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले होते. ही निवडणूक लढण्यासाठी त्यांची गेल्या दोन वर्षांपासून तयारी सुरू आहे.
सुरेश म्हात्रे कोण आहेत
मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना आणि आता पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असा सुरेश म्हात्रे यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास राहिला आहे. ते ठाणे जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती होते. २०१४ मध्ये त्यांनी मनसेच्या तिकिटावर भिवंडी लोकसभेची निवडणूक लढवली असून यामध्ये त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची म्हणजेच ९३ हजार मते मिळविली होती. राज्यमंत्री कपिल पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ते ओळखले जातात.
महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून समजते. पण, महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली तर ठीक. अन्यथा अपक्ष निवडणूक लढविणार आहे.-निलेश सांबरे,अध्यक्ष, जिजाऊ संघटना
भिवंडी लोकसभा मतदार संघातुन निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून त्यासाठी ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळावी, अशी मागणी केली असून याबाबत महाविकास आघाडीचे नेते निर्णय घेणार आहेत.-सुरेश म्हात्रे,पदाधिकारी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष