नाशिक : उमेदवारी अर्ज दाखल करणे अनेकांनी सुरु केल्यानंतरही नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण, हा प्रश्न कायम आहे. या प्रश्नाचे उत्तर मिळण्याऐवजी दिवसेंदिवस उमेदवारीसाठी इच्छुकांच्या संख्येत वाढ होत असल्याने महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते चक्रावले आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात प्रचार सुरु करण्याआधी महायुतीत उमेदवारीसाठीची स्पर्धा तीव्र झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मविआकडून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर होऊन महिना होत आला असताना महायुतीत मात्र जागा कोणाची, उमेदवार कोण, हेच गुऱ्हाळ सुरु आहे. प्रारंभी विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील, असे गृहित धरुन शिंदे गटात निश्चिंतता होती. परंतु, अचानक भाजपच्या स्थानिक आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी गोडसे यांना विरोध करत मतदारासंघावर जागा सांगितला. भाजपकडून उमेदवारीसाठी आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, मागील तीन-चार वर्षांपासून निवडणुकीची तयारी करणारे दिनकर पाटील यांची नावे घेण्यात येऊ लागली. दिनकर पाटील समर्थकांनी तर समाज माध्यमातून आपला उमेदवार कसा योग्य आणि गोडसे कसे निष्क्रिय, हे दाखविण्यात कोणतीही कसूर ठेवली नाही. शिंदे गट आणि भाजप यांच्यातील या स्पर्धेत अचानक दिल्लीचा आशीर्वाद असल्याचा दावा करुन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आले.

हेही वाचा…जनता व कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन मुंबईथील भाजपच्या तिन्ही खासदारांना भोवले

दिल्लीकडून आग्रह असतानाही आपलाच पक्ष जोर लावत नसल्याचे पाहून उद्विग्न भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली. भुजबळ यांच्या माघारीनंतरही परिस्थितीत कोणताच बदल झाला नाही. उलट, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून इच्छुकांच्या यादीत सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे, शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महंत शांतिगिरी महाराज, विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे यांच्या सूनबाई भक्ती गोडसे, भाजपकडून स्वामी श्रीकंठानंद, महंत सिध्देश्वरानंद सरस्वती, अखिल भारतीय संत समिती, धर्म समाजचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख महंत अनिकेतशास्त्री यांच्या नावांची भर पडली. त्यातच माजी महापौर दशरथ पाटील यांनी अजूनही उमेदवारीसाठी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. महायुतीत नावांचा असा फुगवटा दिवसेंदिवस वाढतच असून अधिकृत उमेदवारी जाहीर होईपर्यंत त्यात अजूनही अनेकांची भर पडू शकते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Competition for mahayuti candidature intensifies for nashik lok sabha seat print politics news psg
Show comments