लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांवर आश्वासनांची खैरात करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सध्या स्पर्धा लागली आहे. महायुतीने महिलांना दरमहा २१०० रुपये, तर महाविकास आघाडीने तीन हजार रुपयांचे आश्वासन दिले आहे. या स्पर्धेत मतदारांना आपलेसे करण्याकरिता विविध आश्वासने वा प्रलोभने दाखविली जात असली तरी या आश्वासनांची पूर्तता करण्याची राज्याच्या तिजोरीची क्षमता आहे का, याचा विचार उभय बाजूने केलेला दिसत नाही.

प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात मतदारांना आश्वासने देण्याची दोन्ही बाजूने स्पर्धा लागली आहे. महायुतीने दशसूत्रीच्या माध्यमातून विविध समाजघटकांना खूश करण्यावर भर दिला आहे. महाविकास आघाडीने पंचसूत्रीच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवक, युवतींना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा >>>त्र्यंबकनगरीत पूजाअर्चेसाठी उमेदवारांची गर्दी वाढली

महिलांना दरमहा तीन हजार रुपये आणि राज्यभर मोफत बस प्रवास, शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, जातनिहाय जनगणना व ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटविणे, २५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा व मोफत औषधे, बेरोजगार तरुणांना दरमहा चार हजार रुपयांची मदत अशी पाच कलमी आश्वासनांची गॅरंटी काँग्रेसच्या पक्षाच्या पुढाकाराने महाविकास आघाडीच्या वतीने राज्यातील मतदारांना देण्यात आली. शिवसेनेने (ठाकरे) आपल्या वचननाम्यात एसटीबरोबरच बेस्टसह परिवहन उपक्रमाच्या बसेसमध्ये मोफत बस प्रवासाचे आश्वासन दिले आहे.

महायुतीने लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये, २५ हजार महिलांचा पोलीस दलात भरती, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेतून १२ हजारांवरून १५ हजार रुपये, वृद्धांना २१०० रुपये निवृत्तिवेतन, जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणे, १० हजार विद्यावेतन, ४५ हजार गावांमध्ये रस्ते बांधणार, अंगणवाडी आणि आशासेविकांना दरमहा १५ हजार रुपये, सौरऊर्जेला प्राधान्य त्यातून वीज बिलात कपात अशी विविध आश्वासने देण्यात आली आहे.

हेही वाचा >>>नवाब मलिक वि. अबू आझमी: मानखूर्दमध्ये दोन मुस्लीम नेत्यांच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाला लाभ मिळणार?

महिला, शेतकरी लक्ष्य

महायुतीने लाडक्या बहिणींना १५०० रुपयांवरून २१०० रुपये प्रत्येक महिन्याला देण्याचे आश्वासन दिले आहे. महाविकास आघाडीने तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. महायुतीपेक्षा महाविकास आघाडीने ९०० रुपये दरमहा अधिक देण्याचे आश्वासन दिले आहे. कर्नाटक आणि तेलंगणाप्रमाणेच महालक्ष्मी योजनेत महिला व युवतींना राज्यभर मोफत प्रवासाचे आश्वासन देण्यात आले आहे. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. महायुतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी असा उल्लेख केला असला तरी मर्यादा मात्र दिलेली नाही. आरोग्यावर महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीत समावेश आहे, पण महायुतीने आरोग्यावर काहीही आश्वासन दिलेले नाही. जातनिहाय जनगणना आणि आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देऊन राहुल गांधी यांनी लोकसभेप्रमाणेच दलित समाज महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहील या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. महायुती व महाविकास आघाडीची आश्वासने जाहीर झाली आहेत. मतदार आता कोणाला पसंती देतात हे २३ तारखेला स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Competition of promises between mahayuti and mahavikas aghadi voter print politics news amy