सुजित तांबडे
राजकारणात पद आणि खुर्ची मिळविण्यासाठी जीवघेणी स्पर्धा चाललेली असते. कधी ती उघड असते, तर कधी छुपी. सध्या पुण्यात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्ष पदासाठी छुपी स्पर्धा सुरू झाली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्षपद हे माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांच्याकडे प्रभारी देण्यात आले आहे, तर भाजपचे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक हे मागील दोन वर्षांपासून या पदावर आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये शहराध्यक्ष बदलाच्यानिमित्ताने पक्षांतर्गत गटबाजी आणि अंतर्गत धुसफूस वाढली आहे.
मुळीक यांची भाजपच्या शहराध्यक्षपदी २०२० मध्ये नियुक्ती करण्यात आली. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुळीक यांचा वडगाव शेरी मतदार संघातून पराभव झाल्यानंतर भाजपने त्यांचे लगेचच राजकीय पुनर्वसन करत त्यांच्या पदरी शहराध्यक्ष दिले. मागील लोकसभा निवडणुकीत वडगावशेरी विधानसभा मतदार संघातून खासदार गिरीश बापट यांना भरघोस मते मिळाल्याने त्या कामाची पावती म्हणूनही त्यांची शहराध्यक्ष पदावर वर्णी लागल्याचे बोलले जाते. तत्पूर्वी पर्वती विधानसभा मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे शहराध्यक्ष पद होते. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष बदलाची मागणी सुरू झाली आहे. भाजपच्या शिस्तीच्या चौकटीनुसार याबाबत उघडपणे बोलण्यात येत नसताना भाजपचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी पाहिल्यांदा या विषयाला वाचा फोडली आहे. त्यांनी मुळीक यांना या पदावरून हटविण्याची मागणी केली आहे. केसकर यांच्या या भूमिकेमुळे आता भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि नाराजी उघड झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शहराध्यक्ष पदाला महत्त्व आहे. त्यामुळे माजी महापौर मुरलीधर मोहोळ किंवा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे शहराध्यक्ष पद देण्याची मागणी केसकर यांनी केली आहे. त्यामुळे भाजपकडून शहराध्यक्ष पदामध्ये बदल केला जाणार की नाही, याबाबत उत्सुकता असणार आहे. केसकर यांच्या वक्तव्यानंतर भाजपकडून मौन पाळण्यात आले आहे.
हेही वाचा… नगरच्या नामांतरावरून भाजप खासदाराचा स्वपक्षीय आमदारालाच घरचा आहेर
काँग्रेसमध्ये सध्या गटबाजीला उधाण आले आहे. माजी आमदार रमेश बागवे यांच्याकडील शहराध्यक्ष पद काढून सात महिन्यांपूर्वी अरविंद शिंदे यांच्याकडे प्रभारी कारभार सोपविण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर पक्षांतर्गत गटबाजी वाढली आहे. शिंदे यांच्याकडून कोणताही कार्यक्रम घेण्यात आला की, त्या कार्यक्रमाला काही अनुभवी नेतेमंडळी पाठ फिरवित आहेत. गेल्या आठवड्यात काँग्रेसचा वर्धापन दिन झाला. यानिमित्ताने पुण्यातील काँग्रेस भवनला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी भेट दिली. त्यावेळीही प्रमुख नेते अनुपस्थित होते. त्यामध्ये माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, माजी नगरसेवक आबा बागुल आदींचा समावेश होता.
हेही वाचा… सांगलीत भाजप खासदाराच्या विरोधात पक्षातच खदखद
काँग्रेसकडून होणाऱ्या आंदोलनामध्येही ही गटबाजी दिसून येत आहे. शिंदे यांनी कार्यक्रम घेतल्यावर विरोधी गट त्या कार्यक्रमाला गैरहजर असतो, तर विरोधी गटाने कार्यक्रम किंवा एखाद्या विषयावर आंदोलन केले की, त्या ठिकाणी शिंदे हे हजर नसतात. त्यामुळे काँग्रेसमधील ही गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे.
हेही वाचा…राजकीय आरोप -प्रत्यारोपांच्या फैरीत विदर्भाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष
होमहवन चर्चेत
शिंदे हे जून महिन्यापासून प्रभारी शहराध्यक्ष म्हणून काम पहात आहेत. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळावे म्हणून त्यांनी काँग्रेस भवनमध्ये गेल्या महिन्यात होमहवन केले. त्या प्रकारानंतर शिंदे यांच्यावर टीका झाली. हे निमित्त घेऊन आता शिंदे विरोधकांनी पूर्णवेळ शहराध्यक्ष नेमण्याची मागणी सुरू केली आहे.