पिंपरी : भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्षपदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने शहराध्यक्ष बदलाच्या चर्चेने वेग आला आहे. मात्र, महापालिका निवडणुकीपूर्वी बदल करायचा की नको? यावर शहर भाजपमध्ये दोन मतप्रवाह आहेत. पक्षाच्या घटनेनुसार दुसऱ्यावेळी संधी न देता बदल करावा, असा एक मतप्रवाह आहे, तर महापालिका निवडणूक होईपर्यंत लांडगे यांनाच शहराध्यक्षपदी कायम ठेवावे, अशीही भूमिका घेण्यात येत आहे. त्यामुळे शहराध्यक्ष बदलणार की लांडगे यांनाच मुदतवाढ मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत २०१४ मध्ये अपक्ष आणि २०१९ मध्ये भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या महेश लांडगे यांच्याकडे १६ जानेवारी २०२० रोजी भाजपच्या शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. त्यांचा शहराध्यक्षपदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपून तीन महिने पूर्ण झाले. त्यामुळे भाजपमध्ये शहराध्यक्ष बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
हेही वाचा – ठाकरे गटाची बीडमध्ये कोंडी
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली सन २०१७ ची महापालिका निवडणूक लढवत पालिकेवर पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले. जगताप यांच्यानंतर लांडगे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. लांडगे यांच्या कार्यकाळात महापालिका निवडणुका झाल्या नाहीत. त्यापूर्वीच त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता आणायची असेल, तर लांडगे यांच्याकडेच शहराध्यक्षपद ठेवावे, अशी मागणी करण्यात येत आहे. लांडगे यांचे गावकी-भावकीत असलेले वजन, दांडगा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे जाळे आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक होईपर्यंत कोणताही बदल करू नये. लांडगे यांच्या नेतृत्वाखालीच महापालिका निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे, असे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र, पक्षाच्या घटनेनुसार सलग दुसऱ्यावेळी अध्यक्षपद देऊ नये, नवीन पदाधिकाऱ्याला संधी द्यावी अशी काही पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत प्रबळ दावेदार असतानाही शंकर जगताप यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्यांच्याऐवजी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शंकर यांच्यावर अन्याय झाला. शहराध्यक्षपद देऊन पोटनिवडणुकीत त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा, अशी एका गटाची मागणी आहे. पक्षश्रेष्ठींनी पोटनिवडणुकीवेळी शंकर जगताप यांना शहराध्यक्षपदाचा शब्द दिल्याचेही सांगितले जाते.
अश्विनी जगताप आमदार आहेत. त्यामुळे शंकर यांना शहराध्यक्षपद दिल्यास एकाच घरात दोन पदे होतील, अशी भूमिका घेत एका गटाकडून विरोधी सूर काढण्यात येत आहे. त्यामुळे प्रदेश नेतृत्व दोन्ही गटांचा समेट कसा घडवून आणते, पक्षाच्या घटनेनुसार शहराध्यक्ष बदल केला जातो की महापालिका निवडणूक होईपर्यंत विद्यमान शहराध्यक्ष लांडगे यांनाच मुदतवाढ दिली जाते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले आहे.
याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी पक्षाचे निरीक्षक शहरात येतील. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून वरिष्ठांकडे अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर शहराध्यक्ष निवडीचा निर्णय होईल.
इच्छुकांची रांग
केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असल्याने आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्षपदासाठी इच्छुकांची मोठी रांग आहे. भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, महापालिकेचे माजी सभागृह नेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात हे शहराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.