सांगली : हळद व बेदाणा बाजारासाठी देशभरात लौकिक असलेल्या सांगली बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा वरकरणी दुरंगी सामना होत असला तरी याला अंर्तविरोधाबरोबरच बर्हिविरोधाचे अनेक पैलू आगामी काळात पाहण्यास मिळणार आहेत. भाजप पॅनेलचे नेतृत्व पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे असले तरी सारी मदार जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या शिरावर असून त्यांनाच सहभागी करून घेण्याचा राष्ट्रवादीचा पर्यायाने प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचा डाव काँग्रेसच्या ताठर भूमिकेमुळे असफल ठरला. मात्र, गटातटाचे राजकारण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी विधानसभा नजरेसमोर ठेवून पॅनेलचे उमेदवार मिरजेत निश्‍चित केल्याने या असंतोषाचा फटका कोणाला बसणार याची उत्सुकता निकालापर्यंत कायम राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हजारो कोटींची उलाढाल असलेली सांगली बाजार समिती म्हणजे जिल्हा बँकेनंतर मोठी आर्थिक ताकद असलेली सहकारी संस्था. यामुळे याठिकाणी काम करण्याची दुसर्‍या व तिसर्‍या फळीतील अनेक नेत्यांचे स्वप्न असते. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका खूपच लांबल्याने अनेक इच्छुक बाजार समितीसाठी इच्छुक होते. यामुळे संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी तब्बल ५९० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत राजकीय मोर्चेबांधणी सुरूच होती. ही मोर्चेबांधणी जरी उमेदवारी माघारीची मुदत संपली तरी चालूच राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – नरोडा पाटिया हत्याकांड; भाजपाच्या माया कोडनानी, VHPचे जयदीप पटेल, बजरंग दलाचे बाबू बजरंगी यांची निर्दोष मुक्तता

या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे जागा वाटप करीत असताना काँग्रेसला झुकते माप दिल्याचे प्रथम दर्शनी दिसत असले तरी काँग्रेसची अवस्था ‘रणांगणावर बाजी आणि तहात माजी’ अशी झाली आहे. काँंग्रेसच्या वाट्याला आलेल्या सात जागांपैकी चार जागा जतसाठी म्हणजेच पर्यायाने आ. विक्रम सावंत यांच्या ताब्यात गेल्या आहेत. तर उर्वरित तीन जागा मिरजेला मिळाल्या आहेत. मतदार संख्या जतची अधिक असल्याने जतचा हक्क अधिक हे मान्य केले तर जतला मिळालेल्या जागा या राखीव कोट्यातील अधिक आहेत. तर मिरजेला मिळालेल्या तीन जागा वसंतदादा गटातील विशाल पाटील यांच्या गटाला एक, श्रीमती जयश्री पाटील गटाला एक आणि पृथ्वीराज पाटील यांच्या गटाला एक अशी अंतर्गत वाटणी झाल्याचे प्रथम दर्शनी दिसते. तर कवठेमहांकाळसाठी दोन जागा माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या गटासाठी सोडण्यात आल्या आहेत. मुळात हा गट शेतकरी विकास आघाडीच्या नावाखालीच असल्याने या गटाला देण्यात आलेल्या जागा या शिवसेनेच्या म्हणता येतील का असा सवाल ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी उपस्थित केला आहे. यामुळे महाविकास आघाडीत तीव्र मतभेद असल्याचे समोर आले असले तरी याचा बाजार समितीच्या मतावर फारसा परिणाम होणार नसला तरी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये निश्‍चितच याचे परिणाम पाहण्यास मिळतील.

हेही वाचा – पुलवामा हल्ल्याचे सत्य सांगणाऱ्या सत्यपाल मलिक यांना शेतकरी नेते आणि खाप पंचायतींचा पाठिंबा; शनिवारी दिल्लीत बैठक

दुसर्‍या बाजूला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सावंत हे पहिल्यापासून महाविकास आघाडीच्या झेंड्याखालीच निवडणुका होतील असे सांगत होते. मात्र, याच पक्षातील विशाल पाटील वसंतदादांच्या विचारावर निवडणूक लढविण्याचे मनसुबे मांडत होते. तर आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस भाजपमधील एका गटाला सोबत घेण्यासाठी व्यूहरचना करण्यात मग्न होता. यातून जतचे जगताप यांना राजी करण्यात यश आले असताना भाजपमध्येही खासदार गटाला सोबत घेण्यास नाखूषी होतीच. तरीही अखेरच्या टप्प्यात भाजपमध्ये रूसवे फुगवे दूर झाले ते राष्ट्रवादीच्या खेळीने. यातूनही जतचा राजकीय संघर्ष यानिमित्ताने उफाळून आल्याने जागा वाटपात तडजोड फिसकटली आणि राष्ट्रवादीने जुळवून आणलेली राजकीय खेळी उद्ध्वस्त झाली. यामुळेच आता होत असलेली बाजार समितीची राजकीय लढाई अंर्तविरोध आणि बहिर्विरोध यामुळे गाजणार तर आहेच, पण आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीची पेरणी करणारी ठरली तर नवल नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Condition of congress in the background of of sangli bazar samiti elections print politics news ssb
Show comments